तिरोडा : केंद्र सरकार दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवून कोविडमुळे बेरोजगार व आर्थिक विवंचनेत सापडलेल्या जनतेची पिळवणूक करीत आहे. या वाढत्या महागाईला जबाबदार भाजप सरकारला जाब विचारण्यासाठी तरुणाई पुढे येत आहे. ७ वर्षांपूर्वी खोटी आश्वासने देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेची दिशाभूृल करणाऱ्या भाजपला आता तरुणाई पुन्हा विसरणार नसून जनता जागरूक झाली आहे. क्षेत्राच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ग्राम चिखली येथील संजय चुटे यांच्या निवासस्थानी आयोजित जिल्हा परिषद क्षेत्र ठाणेगावच्या पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी, जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय बूथ कमिटीचे सशक्तीकरण व कार्यकर्त्यांशी समन्वय साधून आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्ष वाढीवर भर देण्यात यावा, असे सांगितले. सभेला राजलक्ष्मी तुरकर, प्रेमकुमार रहांगडाले, योगेंद्र भगत, रविकांत बोपचे, कैलास पटले, मनोज डोंगरे, नीता रहांगडाले, जया धावडे, डॉ. संदीप मेश्राम, योगेंद्र कटरे, शिशुपाल पटले, राजू ठाकरे, किरण बन्सोड, नितेश खोब्रागडे, किशोर पारधी, संंजय रावल, रवींद्र तिडके, संजय चुटे, यश रहांगडाले, के. एस. पटले यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.