गोंदिया :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून खा. शरद पवार व अजित पवार असे दोन गट पडले आहेत. मात्र, खा. प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांच्यासोबत असून, त्यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रावरील राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा कायम ठेवला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात २४ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या मेळावा आयोजित केला असून, याच मेळाव्यातून खा. प्रफुल्ल पटेल हे लोकसभा निवडणुकीचा शंखनाद करणार असल्याची माहिती आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जागा वाटपाचा नेमका कोणता फार्म्युला ठरतो हे येणार काळच सांगेल. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता; पण आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील नव्या समीकरणामुळे यातही पेच निर्माण झाला आहे, तर या मतदारसंघात विद्यमान खासदार हे भाजपचे आहेत. त्यामुळे महायुतीत यावर नेमका कसा तोडगा काढला जातो हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रावरील दावा सोडलेला नाही, तर महाविकास आघाडीचेसुद्धा जागा वाटप केले नसले तरी काँग्रेसने या मतदारसंघावर दावा सांगत मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीसुद्धा दोन्ही जिल्ह्यांतील काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची हा मतदारसंघ काँग्रेस लढवावा अशी इच्छा असल्याचे सांगत त्यांनी अनुकूलता दर्शवीत मोर्चेबांधणीला सुरुवात केली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेसुद्धा यासाठी कंबर कसली आहे. याचीच सुरुवात २४ ऑगस्ट रोजी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात कार्यकर्ता मेळाव्यातून करणार आहे. खा. प्रफुल्ल पटेल हे या दोन्ही मेळाव्याला उपस्थित राहून लोकसभा निवडणूक तयारीचा शंखनाद करणार आहेत. या मेळाव्याच्या भव्य आयोजनासाठी माजी आ. राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
बुथ कमिटी व सक्रिय सदस्य नोंदणी वाढविण्यावर भर
राष्ट्रवादी काँग्रेसने या मेळाव्याच्या माध्यमातून प्रत्येक गावात बुथ कमिटी बळकट करणे व सक्रिय सदस्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. या मेळाव्यात खा. प्रफुल्ल पटेल व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणार असल्याची माहिती आहे.
गोंदिया-भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस खा. प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. कार्यकर्ता मेळाव्यातून पक्ष बांधणी व निवडणुकांच्या अनुषंगाने संवाद साधण्यात येणार आहे.
- राजेंद्र जैन, माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस