गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय महादेवराव शिवणकर यांनी आज(दि.१६) आपल्या समर्थकासंह मुबंई येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारीणी बैठकीत त्यांनी उपस्थित होऊन पक्ष प्रवेश केला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार, खासदार सुनिल मेंढे आदी उपस्थित होते. एकेकाळी भाजपमध्ये मोठे नेते असलेले महादेवराव शिवणकर यांचे विजय हे पुत्र आहेत.
शिवणकर यांनी सोमवारी जिल्हाध्यक्ष पदाचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठविला. यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांच्या पूर्वीच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठविलेल्या राजीनाम्यात त्यांनी पक्षात समन्वय आणि सामंजस्याचा अभाव असून, अशा वातावरणात आपली जबाबदारी पार पाडणे अशक्य असल्याचे म्हटले होते. शिवणकर हे मागील दोन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. त्यांच्यासोबत एका राजकीय पक्षाचे काही पदाधिकारीदेखील सोबत आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवणकर हे भाजपमध्ये परतणार असल्याची चर्चा होती. आज या त्यांच्या प्रवेशाने या चर्चांना पूर्णविराम लागला.
शिवणकर यांच्यासह बाबुलाल दोनोडे, वसंत पुराम, तुकाराम बोहरे, रामेश्वर पंधरे, अजय बिसेन, नरेंद्र शिवणकर, केशव भूते, भास्कर धरमशहारे, जलाल पठाण, घनश्याम कटरे, बबलू डोये आदींनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
वर्धा जिल्ह्यात भाजपला धक्का
तर दुसरीकडे वर्धा जिल्ह्यात भाजपला एक धक्का बसला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत १५ नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजपची शेतकरी विरोधी बूमिका, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी यामुळे जनता त्रस्त झालेली आहे. या सर्वांना कंटाळून वर्धा जिल्ह्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी सोमवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.