लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : गोंदिया जिल्ह्यात धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात असून यंदा रब्बी हंगामात धानाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. मात्र केंद्र सरकारने जिल्ह्यासाठी धान खरेदीची मर्यादा ही ४ लाख ७९ हजार क्विंटल ठरवून दिली आहे. त्यामुळे २४ लाख क्विंटल धान विकायचा कुठे, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला. धान खरेदीची मर्यादा ३० लाख क्विंटलपर्यंत वाढवून देण्यात यावी, या मागणीला घेऊन सडक-अर्जुनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी (दि. २०) सकाळी १० वाजता गोंदिया-रायपूर मार्गावरील कोहमारा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोहमारा येथील टी पाॅईंट चौकात रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर सडक अर्जुनी येथील तहसील कार्यालयावर आ. मनोहर चंद्रिकापुरे, माजी आ. राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, अविनाश काशीवार यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्च्यात सहभागी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आधी शेतीमालाला हमीभाव न देणे आणि आता खरेदीला मर्यादा घालून केंद्र सरकार शेेतकऱ्यांची गळचेपी करून रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप केला. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ करून केंद्र सरकारने महागाईत भर टाकली असून गोरगरीब व सर्वसामान्यांचे जगणे कठीण बनले आहे. तसेच खते आणि बियाणांच्या वाढत्या किमतीमुळे शेती करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने रब्बीतील धान खरेदीची मर्यादा त्वरित वाढवून द्यावी व पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमती आटोक्यात आणाव्यात, या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानावाने तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी जि. प. उपाध्यक्ष यशवंत गणविर, जि. प. सदस्या सुधा रहांगडाले, डी. यू. रहांगडाले, तेजराम मडावी, रुकीराम वाढई, रमेश चुऱ्हे, अजय लांजेवार, राहुल यावलकर, आशिष येरणे, कामिनी कोवे, दिलीप कापगते, शिवाजी गहाणे, लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, आनंद अग्रवाल, पुष्पमाला बडोले, शुभांगी वाढवे, मंजू डोंगरवार, एफ.आर.टी. शहा, अनिता बांबोडे, ईश्वर कोरे, दिनेश कोरे उपस्थित होते.
या होत्या प्रमुख मागण्या... - केंद्र सरकारने धान खरेदीची मर्यादा वाढवून ३० लाख क्विंटल करावी, - मागीलवर्षीच्या तुलनेत वाढलेले खताचे दर कमी करावेत.- पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरचे दर त्वरित कमी करावेत.
केंद्रातील माेदी सरकार एकीकडे शेतकरीहितैशी असल्याचे भासवित असून दुसरीकडे धान खरेदीला मर्यादा लावून आणि खते, बियाणांचे दर वाढवून त्यांच्या जखमांवर मीठ चोळत आहे. पण केंद्र सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे.- राजेंद्र जैन, माजी आमदारकेंद्र सरकारने रब्बीसाठी ठरवून दिलेली धान खरेदीची मर्यादा त्वरित ३० लाख क्विंटल करून द्यावी, अन्यथा यासाठी शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून अधिक तीव्र आंदोलन करू.- मनोहर चंद्रिकापुरे, आमदार