वीज ग्राहकांची तक्रार : नागरिकांना दिले जाते वाढीव बिलगोंदिया : जिल्ह्यातील विद्युत ग्राहकांना होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ गोंदियाच्या अधीक्षक अभियंता यांना निवेदन दिले. तसेच सामान्य नागरिकांना होणाऱ्या समस्या सोडविण्याची मागणी केली.जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी क्षेत्रात विद्युत विभागाच्या वतीने मागील सहा महिन्यांपासून घरगुती ग्राहकांना अत्याधिक रकमेचे बिल मिळत आहेत. विद्युत बिलांचे अतिभार व इतर शुल्कांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना मोठ्या रकमेचे बिल मिळत आहेत, ते दुरूस्त करण्यात यावे. विद्युत ग्राहकांची तक्रार असल्यास व मीटर खराब असल्याच्या तक्रारीवरही मीटर बदलविण्याची कार्यवाही करण्यात यावी. विद्युत प्रवाह अनियंत्रित असल्यामुळे वेळीअवेळी विद्युत पुरवठा खंडित होत आहे.विशेष म्हणजे ट्रान्सफॉर्मर जळणे, फेज जाणे व विद्युत उपकरणे खराब होण्याच्या तक्रारी सामान्य झाल्या आहेत. त्यामुळे अनेक क्षेत्रात, अनेक गावांत रात्ररात्रभर विद्युत पुरवठा होत नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ट्रान्सफॉर्मर व विद्युत लाईनची आवश्यक दुरूस्ती करण्याबाबत अधीक्षक अभियंता यांना आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात निवेदन देवून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. मागण्या १५ दिवसांत पूर्ण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलनाचा इशारासुद्धा देण्यात आला आहे. याप्रसंगी आ. राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, शहर अध्यक्ष शिव शर्मा, प्रदेश प्रतिनिधी देवेंद्रनाथ चौबे, जिल्हा प्रवक्ता अशोक शहारे, रवी मुंदडा, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष केतन तुरकर, मुजीब पठान, खालीद पठान, करण गिल, संजीव राय, रौनक ठाकूर, आशा पाटील, नरू हालानी, जयंत कछवाह व इतर पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
वीज समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन
By admin | Published: May 25, 2016 2:05 AM