आमगाव : देशात काही लोक समाजाला धर्म व जातीच्या नावावर तोडण्याचे कृत्य करीत आहेत. तर संघ समाजाला संघटीत करून भारतीय संस्कृतीचे जतन करण्याचे निरंतर कार्य करीत आहे. संघाला एका तासाच्या शाखेत संस्कृती व कर्तृत्वाचे धडे शिकविले जातात. त्यामधून सुसंस्कृत तरूण घडतात. त्यामुळे संघाचे संस्कार समाजात रुजविण्याची नितांत गरज आहे. हीच तरूण पिढी समाजात समरसता निर्माण करेल व समाजाला तोडण्याचे कृत्य करण्याची तोंड बंद होतील. संघाची याच दिशेने वाटचाल सुरू आहे, असे मत अभाविप विदर्भ प्रांत संघटन मंत्री शैलेंद दळवी यांनी व्यक्त केले. आमगावच्या विजयादशमी उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. १२ आॅक्टोबरला सायंकाळी ६ वाजता हा उत्सव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी लीलाधर कलंत्री, तालुका संघचालक निताराम अंबुले, नगर कार्यवाह दिनेश शेंडे उपस्थित होते. सुरूवात शस्त्र व भारतमातेच्या पूजनाने झाली. त्यानंतर स्वयंसेवकानी शारीरिक प्रात्यक्षिके, योगासन व व्यायाम योग सादर केले. वैयक्तिक गीत, सुभाषिते, घोष सादर केले. शैलेंद्र दळवी पुढे म्हणाले, भारत देशाला पराक्रमाची ऐतिहासीक परंपरा लाभलेली आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकटे आली. तेव्हा येथील युवा पिढीने त्यांच्या शौर्याचे प्रदर्शन करीत देशाला वैभव प्राप्त करून दिले. परंतु देशात सध्या वैचारिक मतभेदाची मोठी लढाई सुरू आहे. जे.एन.यु.सारख्या घटना घडत आहेत. अशा विघातक शक्तीविरूध्द देशातील ७० टक्के युवकांनी त्यांचे योगदान द्यावे. लिलाधर कलंत्री यांनी समाजाला संघाची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. नगर कार्यवाह दिनेश शेंडे यांनी प्रास्ताविक केले. अतिथीचा परिचय करून दिला. याप्रसंगी नगरातील नागरिक, स्वयंसेवक, सेविका कार्यक्रमाला उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी ८ वाजता स्वयंसेवकाचे नगराच्या मुख्य मार्गावरून शिस्तबद्ध पथसंचलन केले. ठिकठिकाणी त्याच्यावर पुष्प वर्षाव करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)
संस्कृती टिकविण्यासाठी संस्कार रुजविण्याची गरज
By admin | Published: October 16, 2016 12:27 AM