तालुका कृषी अधिकारी तुमडाम : शेतकरी प्रशिक्षण, सेंद्रिय खताचा वापरबोंडगावदेवी : पारंपरिक पद्धतीने शेती करणे आजघडीला परवडण्यासारखे नाही. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. कीड रोगाच्या संक्रमणाने पीक उत्पादनात घट होत आहे. धान उत्पादनाला लागत जास्त लागते व उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धानाचे उत्पादन घेण्यासाठी नियोजन करून तंत्रशुद्ध पद्धतीचा अंगिकार करणे अतिआवश्यक आहे. महागड्या रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय खताचा मारा करण्याबरोबरच पीक पद्धतीत बदल करणे आज काळाची गरज आहे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी केले.राष्ट्रीय सुरक्षा अभियानांतर्गत अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तिडका येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी गावातील शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी पं.स. सदस्या जयश्री पंधरे होत्या. अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य अशोक लंजे, आसाराम मेश्राम तसेच मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, मंडळ कृषी अधिकारी ऋषी चांदेवार, कृषी पर्यवेक्षक ठाकूर उपस्थित होते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत खरीप व रबी हंगाम प्रकल्पांतर्गत तिडका या गावाची निवड करण्यात आली होती. प्रकल्पांतर्गत गावातील ७५ शेतकऱ्यांची निवड करण्यात येवून खरीप हंगामासाठी एमटीयू १०७५ या जातीच्या धानाचे बियाणे मोफत शेतकऱ्यांना देण्यात आले होते. शेतकऱ्यांनी तंत्रशुद्ध पद्धतीने तसेच कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने धानाची लागवड करुन योग्य जोपासना केल्याने हेक्टरी ५० ते ५५ क्विंटल धानाचे उत्पादन झाल्याचे शेतकऱ्यांनी स्वत:हून सांगितले. पुढील हंगामातसुद्धा एमटीयू १०७५ या जातीच्या धानाची लागवड करुन जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा मनोदय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. दुबार पीक पद्धतीवर आधारित ७५ प्रात्यक्षिक हरभरा वान जँकी ९२१८, विराट तसेच हरभऱ्याला लागणाऱ्या जैविक कीटकनाशकाचा वापर शक्यतो कमीकमी करुन सेंद्रीय खताचा जास्तीत जास्त करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी शेतकऱ्यांना केले. वारंवार धानाचे उत्पादन घेण्याचा हट्ट शेतकऱ्यांनी झिडकावून वेगवेगळे पीक घेण्याची मानसिकता तयार करावी. केळी व भाजीपाला यासारख्या पिकांचे उत्पादन घेतल्यास दुष्काळावर सहज मात करता येईल. शेडनेट, ड्रिपइरिनेशनच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेता येत असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी पर्यवेक्षक ठाकूर यांनी शेतकऱ्यांसाठी असलेल्या कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती सांगितली. संचालन कृषी सहायक अविनाश हुकरे यांनी केले. आभार भारती येरणे यांनी मानले. कार्यक्रमात गावातील बहुसंख्य शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. (वार्ताहर)
पीक पद्धतीत बदल ही काळाची गरज
By admin | Published: January 04, 2016 4:11 AM