पालकवर्ग चिंतीत : वेळीच दखल घेणे गरजेचेरावणवाडी : शाळा-महाविद्यालय हे पूर्वीप्रमाणे ज्ञानदानाचे कार्य करणारे पवित्र मंदिर राहिले नाही. शिक्षणाला व्यावसायिकतेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे तरूणावर ठराविक वयात होणारे संस्कार योग्य प्रकारे होत नाही. या अभावामुळे महाविद्यालयीन तरूण व्यसनी होत आहे. भविष्याचा विचार करता या प्रकाराची दखल वेळीच घेणे गरजेचे आहे. आयुष्यभर मुलांच्या भविष्याची चिंता करीत त्याकरिता व्यवस्था करीत असणाऱ्या पालकांवर कॉलेजात शिकणाऱ्या मुलांच्या व्यसनाधिनतेमुळे चिंतेचे सावट पसरले आहे. परिवर्तन हा समाजाचा नियम असल्यामुळे योगायोगानेच शिक्षण क्षेत्रातही वेगवेगळे बदल घडून आले. त्यामुळे याला व्यावसायिकतेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. गुरू द्रोणाचार्य व शिष्य एकलव्य ही परंपरा लाभलेल्या संस्कृतीला आज तसे गुरु व शिष्य मिळणे दुरापास्त झाले आहे. आज शिक्षक विद्यार्थ्यांना शाळेत विद्यादान करण्यापेक्षा कोचिंग क्लॉसेसमध्ये जास्त पैसे मिळत असल्याने ते शिकविण्यात धन्यता मानतात. त्यामुळे विद्यार्थी सैरावैरा झालेले दिसून येतात. सध्या कनिष्ठ तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील तरूण मोठ्या प्रमाणात व्यसनधिनतेकडे आकर्षिले जात असल्याचे चित्र आहे. गुटखा, तंबाखू, सिगरेट मद्यपींची संख्या घटण्याऐवजी दिवसागणिक वाढतच आहे. यामुळे मात्र तरूण पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे. खर्रा, गुटखा, सिगरेट यावर महिन्याकाठी हजारो रुपयांपेक्षा अधिक खर्च करून तरूणवर्ग एक प्रकारे कॅन्सरच विकत घेत आहेत.प्रत्येक ठिकाणी असलेल्या पानटपऱ्यांवर तंबाखूची पर्यायाने कॅन्सरची विक्री होत आहे आणि घेण्यासाठी तरूणाच्या रांगा लागत आहेत. पानटपऱ्या चालकांकडून खाणाऱ्यांची हौश पुरविण्याकरिता मागेल तसा आणि हवा तशा गुटखा तयार करून दिला जात आहे. या तरूणांमधील वाढत्या व्यसनाधिनतेचे प्रमाण लक्षात घेता पालकांनी तसेच सामाजिक संघटनांनी वेळीच लक्ष घेऊन मार्गदर्शन करणे काळाची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
व्यसनाधीन तरूण पिढीला योग्य मार्गदर्शन काळाची गरज
By admin | Published: February 26, 2016 2:05 AM