गोंदिया/ सालेकसा : तालुक्यातील नानव्हा-घोंसी मार्गावर तयार करण्यात आलेला पूल जीर्ण झाला आहे. हा पूल केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने गावकऱ्यांनी या पुलाच्या बांधकामाची मागणी केली. पण संबंधित विभागाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी गुरुवारपासून (दि.२४) जीर्ण झालेल्या पुलावरच उपोषणाला सुरुवात केली आहे.
जोपर्यंत शासनस्तरावर दखल घेऊन निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत उपोषण सुरू निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. उपोषणाला पंचायत समिती सदस्या अर्चना मडावी, नानव्हाचे सरपंच गौरीशंकर बिसेन, दरबडा येथील सरपंच तमिलकुमार टेंभरे यांच्यासह उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी सहभागी झाले आहेत. नानव्हा-घोंसी मार्गावरील पूल हा सुमारे ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. या पुलावरुन शेकडो शेतकरी, विद्यार्थी, नागरिक दररोज प्रवास करतात. परंतु गेल्या २ ते ३ वर्षांपासून या पुलाची दुरावस्था झाल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. पुलाच्या दुरुस्तीबाबत ग्रामपंचायत नानव्हाच्या वतीने शासन व प्रशासनाला निवेदन देण्यात आले. पण याची अद्यापही दखल घेण्यात आली. त्यामुळे नानव्हाचे सरपंच गौरीशंकर बिसेन व ग्रामस्थांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. सहसराम कोरोटे, जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग गोंदिया, माजी आमदार संजय पुराम, पोलिस निरीक्षक सालेकसा यांना निवेदन दिले होते. तसेच नानव्हा-घोंसी रस्त्यावरील पुलाचे बांधकाम न केल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता.
सात दिवसांचा दिली होती मुदत
या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात यावे यासाठी गावकऱ्यांनी शासन आणि प्रशासनाला सात दिवसांची मुदत दिली हाेती. पण यानंतरही पुलाची पर्यायी व्यवस्था करून पुलाचे बांधकाम सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे सरपंच गौरीशंकर बिसेन यांच्यासह अर्चना मडावी, राजेश कटरे, तमिल टेभरे, पृथ्वीराज हरिणखेडे, दुर्गाश चव्हाण, विजय शरणागत, प्रशांत टेभुर्णीकर, उंमाप्रसाद उपराडे, अविनाश टेभुर्णीकर, कमलेश कटरे, दिनेश तांडेकर, लालचंद बिसेन, मेहरचंद भंडारी, लक्ष्मण बागडे, सहेसलाल जामडीवार, परमानंद फुलबांधे, परमानंद कांबळे या गावकऱ्यांनी चक्क पुलावरच गुरुवारपासून उपोषण सुरु केले.