गोंदिया : विनापरवानगी कोविडचा उपचार करणाऱ्या गोंदिया शहरातील न्यू बालाजी नर्सिग होमची मान्यता गोंदियाच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी रद्द केली आहे. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भागात डॉ. नीतेश बाजपेयी यांनी न्यू बालाजी नर्सिग होम उघडून परवानगी न घेताच ३० कोरोना रुग्णांवर उपचार केला. यामुळे त्याच्यावर रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक असते. त्याने परवानगीसाठी अर्ज केले होते. परंतु त्याच्या हॉस्पिटलला मंजुरी मिळाली नव्हती. तरी देखील डॉ. नितेश बाजपेयी याने आपल्या न्यू बालाजी नर्सिग होममध्ये ३० कोरोना रूग्णांवर उपचार केला. कोविड संदर्भात असलेल्या निर्देशांची उल्लघंनही त्याने केले. नायब तहसीलदार संजीवकुमार नीलकंठ बारसागडे (५०) यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसात भादंविच्या कलम १८८, २६९,२७०, सहकलम ५१ ब आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ सहकलम साथीचे रोग अधिनियम १८९७ क. २,३,४, सह क महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम २००० क. ३३(२)(ए),सह क बॉम्बे नर्सिंग एक्ट -२००५ कायदा अन्वये गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सकांनी १५ मे रोजी न्यू बालाजी नर्सिग होमची मान्यता बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट अंतर्गत रद्द केली आहे.