देवरी : प्रत्येकाला मतदानाचा हक्क आहे आणि यापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी नवमतदार नोंदणी केली जात आहे. अशात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील नवमतदारांच्या मतदान कार्डाची नोंदणी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे सामाजिक कार्यकर्ता आरती जांगळे यांनी कळविले आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अद्ययावत केली जात असून, त्यानुसार नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. ०१ जानेवारी २०२२ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांचे अर्ज मतदार म्हणून स्वीकारण्यात येत असून, याअंतर्गत चिचगड येथे घेण्यात आलेल्या नवमतदार नोंदणी शिबिरात त्या बोलत होत्या. चिचगड येथील जिल्हा परिषद शाळेच्या सभामंडपात ३५०, तर पालांदूर-जमीदारी येथील अंगणवाडी केंद्रात २५८ नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. देवरी तालुक्यातील नक्षलग्रस्त भागातील नवमतदारांना जागरूक करून त्यांना मतदानाचा अधिकार समजावून मतदान कार्ड तयार करून देण्यास स्थानिक प्रशासनाचा अभाव असल्याने जांगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चिचगड व पालांदूर-जमी. येथे २ दिवसांचे मतदार नोंदणी शिबिर घेतले होते.