गोंदिया : देशात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला व ही स्थिती बघता राज्यात निर्बंध लावण्यास सुरुवात झाली होती. अशात कोरोना नियमांचे पालन करणे सक्तीचे झाले होते व त्यानंतरही नागरिक आपल्या मर्जीने वागत असताना दिसत होते. अशात नागरिकांच्या बेभानवृत्तीवर लगाम लावण्यासाठी नाइलाजास्तव वाहतूक नियंत्रण शाखेला थोडीफार कठोर पावले उचलण्याची गरज पडली होती. त्यात वाहतूक नियंत्रण शाखेने नियम तोडून मनमर्जीने वागणाऱ्यांवर कारवाया करीत दंड ठोठावला होता. शहरात मार्च ते मे महिन्यांपर्यंतच्या कालावधीत शाखेने विविध कलमांतर्गत ४५०५ कारवाया केल्या असून, यातून आठ लाख ९५ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. या वर्षात म्हणजेच, जून ते ३१ मेपर्यंत वाहतूक नियंत्रण शाखेने दहा हजार ३३५ कारवाया केल्या असून, यातून २२ लाख ४६ हजार २५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य शासनाने कडक लॉकडाऊन घोषित केला होता. मात्र त्यानंतरही नागरिकांकडून विनाकारण बाहेर फिरणे यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत होते. अशात त्यांना आवर घालण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेला कारवायांचे हत्यार उपसावे लागते.
-----------------------------
ट्रिपल सिट- १५०
विनामास्क- ०४
विनाहेल्मेट- १०
नो पार्किंग- ९४
मोबाइलवर बोलणे- १६
विनानंबर प्लेट- २२
फॅन्सी नंबर प्लेट-००
विनालायसन्स- ४२०९
----------------------------
लायसन्स नसलेल्यांवरच सर्वाधिक कारवाया
वाहन चालविताना लायन्सस नसणे हा प्रकार आजघडीला सर्वाधिक प्रचलित झाला आहे. पालक आपल्या पाल्यांना लायसन्स नसतानाही वाहन देत असल्याने हा प्रकार सर्वाधिक बघायला मिळत आहे. यातूनच वाहतूक नियंत्रण शाखेने या तीन महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक विनालायसन्सच्या ४२०९ कारवाया केल्या आहेत.
----------------------------
गोंदिया शहरातच नियमांचे उल्लंघन
गोंदिया हे जिल्ह्याचे ठिकाण असून, येथे शहरासह ग्रामीण भाग व अन्य शहर तसेच राज्यातील नागरिक येतात. एवढेच काय तर शहरवासीयांकडूनच सर्वाधिक नियमांचे उल्लंघन केली जात असल्याचे प्रकार घडतात. यामुळेच गोंदिया शहरात सर्वाधिक कारवाया केल्या जातात.
-----------------------------------
वाहतुकीचे नियम हे पुढील व्यक्तीच्या सुरक्षेसह स्वत:च्या सुरक्षेसाठीही आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन समोरच्या व्यक्तीसाठी धोकादायक ठरत असताना यात आपल्यासाठीही तेवढाच धोका असतो. कित्येकदा नियमांचे उल्लंघन अंगलट येते. यामुळे वाहतुकीच्या नियमांचे पालन करूनच वाहन चालवा. शिवाय, पाल्यांनी आपल्या पाल्यांनाही लायन्सस काढून दिल्यावरच वाहन हाती द्यावे.
- दिनेश तायडे
निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया