विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मागील चार दिवसांपासून लोकमतने बाबाटोली येथील लोकांच्या भौतिक सोयी सुविधांच्या समस्या उचलून धरल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे. तर बाबाटोलीत जीवन जगत असलेल्या फकीर समाजाला स्वातंत्र्याच्या ७१ वर्षानंतरही अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसाठी येथील नागरिकांना प्रचंड संघर्ष करावा लागत असल्याची बाब पुढे आली आहे.शासन, प्रशासन लक्ष देत नसल्याने त्यांना आजही पोटाची खडगी भरण्यासाठी वणवण भटकावे लागते. कधी कधी त्यांना उपाशी पोटी रात्र काढावी लागते. लोकमत प्रतिनिधीने बाबाटोली येथील नागरिकांशी संवाद साधला असता येथील ५० स्थायी कुटुंबापैकी केवळ चार कुटुंबाकडे अंत्योदय योजनेचे रेशनकार्डच आहे. तर उर्वरित ९० टक्के कुटुंबांकडे रेशनकार्ड नाही. परिणामी त्यांना अन्नधान्य मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.बाबाटोलीतील महिला पुरुषांसह छोटी मुले एखादा देवदूत येईल आणि आपल्या सर्व समस्या दूर करेल अशी आशा बाळगून आहेत. आम्हाला स्वस्त धान्य दुकानातून दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ मिळावे,अशी अपेक्षा करीत योजनेचा लाभ सुरु करुन द्या हो साहेब अशी आर्त हाक देत होते. २० वर्षांपूर्वी पंतपधान अटबिहारी वाजपेयी यांनी गोरगरिबांसाठी अंत्योदय योजना सुरू केली.या योजनेतंर्गत दोन रुपये किलो गहू, तीन रुपये किलो तांदूळ मिळण्याची सोय प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात केली. त्यानंतर सर्वेक्षणानुसार पात्र लाभार्थ्यांची संख्या वाढत गेली.या योजनेमुळे उपाशी पोटी झोपणाऱ्या लोकांना दिलासा मिळाला होता. परंतू बाबाटोली येथे ३० वर्षापासून वास्तव्यास असलेल्या फकीर समाजाला याचा लाभ मिळाला नाही.जर आम्हाला तीन रुपये किलो तांदूळ मिळण्याचा लाभ देऊ शकत नसाल तर कमीत कमी ५ रुपये किलो तांदूळ योजनेचा लाभ तरी द्या, आम्ही आपल्या मुलांना पोटभर जेवायला देऊ शकू अशी विनंती बाबाटोलीतील नागरिक करीत होते. साधारणत: कोणत्याही कुटुंबाला रेशनकार्ड बनविण्यासाठी रहिवासी दाखला, घर टॅक्स पावती, आधार कार्ड, बँक खाते आणि शंभर रुपयाचे स्टँम्प पेपर तयार करुन तहसील कार्यालयात अर्जासह सादर केल्यास रेशनकार्ड तयार केले जाते.मात्र बाबाटोलीवासीयांना अद्यापही याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे दारिद्रयात जीवन जगून सुध्दा शासकीय योजनापासून वंचित राहावे लागत आहे.मागील तीन दशकांपासून आम्ही येथे राहत आहोत. जवळपास शंभर लोकांचे नाव मतदार यादीत आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी नेते आमच्यापर्यंत येतात मात्र अद्यापही रेशनकार्ड मिळवून देण्यासाठी कुणीच पुढाकार घेतला नाही.-काहारबी शाह, नागरिकरेशन कार्ड तयार केल्यास सर्वांना अंत्योदय योजनेत अन्नधान्य देण्यात येईल. त्यांनी यासाठी पुढाकार घेतल्यास रेशन कार्ड बनविण्यास आपण सहकार्य करू.-खेमराज साखरे,रेशन दुकानदार,सालेकसा
बाबाटोलीतील ९० टक्के कुटुंबांकडे रेशनकार्डच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:57 PM
मागील चार दिवसांपासून लोकमतने बाबाटोली येथील लोकांच्या भौतिक सोयी सुविधांच्या समस्या उचलून धरल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्देपोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती : अनेकदा उपाशीपोटी काढावी लागते रात्र