नवेगावबांध: स्थानिक सरपंचाविरूद्ध अविश्वास प्रस्ताव आणल्यासाठी दिलेल्या नोटिसवर १४ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असताना प्रत्यक्ष ठराव घेण्याच्या वेळी फक्त नऊ सदस्यच उपस्थित असल्यामुळे नवेगावबांध सरपंचाविरूद्धचा अविश्वास प्रस्ताव बारगळला. सविस्तर वृत्त असे की, नवेगावबांध येथील एकूण १७ सदस्यीय ग्राम पंचायतच्या सरपंच म्हणून लीनाताई डोंगरवार यांनी सुमारे अडीच वर्षापूर्वी पद स्विकारले. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राजकीय वातावरण तापले. त्यामुळे काही ग्राम पंचायत सदस्य नाराज झाले. गावातील राजकीय समीकरण बदलविण्यासाठी सरपंच विरोधात अविश्वास प्रस्तावाच्या नोटिसामध्ये एकुण १४ सदस्यांनी स्वाक्षऱ्या करून सदर नोटिस तहसीलदार अर्जुनी मोरगाव यांचेकडे सादर केली. त्यावर तहसीलदारांनी बुधवारी (दि.२९) विशेष सभा ग्राम पंचायत कार्यालयात बोलविली. सदर सभेला सुरूवात करून दुपारी दोन वाजेपर्यंत वाट पाहण्यात आली. निर्धारित वेळेत एकुण १७ सदस्यांपैकी फक्त ९ सदस्यच उपस्थित झाले. त्यामुळे मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ अन्वय अर्जुनी मोरगावचे तहसीलदार रहांगडाले सदर अविश्वास प्रस्ताव रद्द ठरविला. त्यामुळे सरपंच लीनाबाई डोंगरवार यांना जीवदान मिळाले. असे असले तरी सदर प्रस्तावाच्या तारखेच्या तीन दिवस अगोदर विरोधकांना तहसीलदारांनी एक निवेदन दिले होते. निवडणूक दिनांकापासून सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र राखीव जागेतून निवडून आलेल्या प्रत्येक उमेदवाराने दिले. नवेगावबांध ग्राम पंचायतमध्ये असे ११ सदस्य आहेत की जे विविध राखीव प्रवर्गातून निवडून आलेत. परंतु अजुनही त्या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाहीत. त्यामुळे ज्यांचेकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही अशा सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून नंतर अविश्वास प्रस्तावासंदर्भात विशेष सभा बोलविण्यात यावी अशी लेखी मागणी काही सदस्यांनी तहसीलदारांकडे केली होती. परंतु तहसीलदारांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले, असा विरोधी सदस्यांचा आरोप आहे. (वार्ताहर)
सरपंचाविरूद्धचा अविश्वास प्रस्ताव बारगळला
By admin | Published: August 01, 2015 2:14 AM