लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक मतदान प्रक्रियेदरम्यान दोन्ही जिल्ह्यातील अनेक केंद्रावरील ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिन बंद असल्याने हजारो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ३४ मतदान केंद्रावरील मतदान थांबविण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे जोपर्यंत येथील फेरमतदान होत नाही, तोपर्यंत देशात ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत. तेथील मतमोजणी करु नये अशी मागणी खा.प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी (दि.२८) येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिनमध्ये बिघाड असल्याच्या तक्रारी केवळ गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्रात नसून पालघर व उत्तरप्रदेशातील बरहाणपूर येथे सुध्दा ३०० वर ईव्हीएममध्ये बिघाड आल्याची माहिती आहे. त्यामुळे या ईव्हीएम मशीनच्या विश्वासहर्तेवर पुन्हा प्रश्न निर्माण झाला असल्याचे पटेल यांनी सांगितले. भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सुरत येथून मागविलेल्या ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिन्सवर आम्ही सुरूवातीपासून आक्षेप घेतला होता. यासंबंधीची तक्रार सुध्दा मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली होती. मात्र त्यांनी याची गांर्भियाने दखल घेतली नाही. त्याचाच फटका सोमवारी (दि.२८) मतदान प्रक्रियेदरम्यान बसला. महाराष्ट्रात ईव्हीएम मशिन व व्हीव्हीटीपॅट उपलब्ध असताना सुरत येथून मशिन मागविण्याची गरज काय होती? महाराष्ट्रातील तापमान मार्च ते मे दरम्यान सर्वाधिक असते ही बाब सर्वांनाच माहिती आहे. मग अधिक तापमानामुळे व्हीव्हीटीपॅट मशिन काम करीत नसल्याचे निवडणूक विभागाचे अधिकारी सांगत आहे. यावरुन नेमके काय समजायचे असे पटेल म्हणाले. आमचा लोकशाही पध्दतीवर विश्वास असून निवडणुका हे त्याचेच प्रतिक आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पादर्शकपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक विभागाची आहे. ईव्हीएममधील बिघाडाबाबत आपला कुठल्याही राजकीय पक्षावर आरोप नसून हा सर्व निवडणूक विभागाचा गलथान कारभार आहे. जर अधिक तापमानामुळे व्हीव्हीटीपॅट मशिन बंद पडत असतील किंवा काम करीत नसतील तर ज्या मशिन सुरु आहेत त्या देखील योग्य तºहेने काम करीत आहेत का? हे कसे समजायचे असा सवालही पटेल यांनी उपस्थित केला. यासर्व प्रक्रियेमुळे झालेल्या मतदानावर सुध्दा प्रश्न चिन्ह निर्माण झाला असून मतदान झालेल्या सर्व व्हीव्हीटीपॅटच्या पावत्यांची शंभर टक्के मोजणी करण्यात यावी. अशी मागणी पटेल यांनी केली. पत्रकार परिषदेला आ.राजेंद्र जैन व पदाधिकारी उपस्थित होते. बॅलेट पेपरने निवडणुका का नाही? अमेरिका, फ्रॉन्ससारख्या प्रगत देशांनी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरने मतदान घेतले जात आहे. मग महाराष्ट्रातच बॅलेट पेपरने निवडणुका घेण्यासाठी अडचण काय? असा सवाल पटेल यांनी उपस्थित केला. देशभरातील सर्व विरोधकांनी यावर एकत्र येवून मंथन करण्याची व हा मुद्दा लावून धरण्याची गरज असल्याचे सांगितले. त्या दिवशी सुट्टी जाहीर करा ईव्हीएम आणि व्हीव्हीटीपॅट मशीन मधील बिघाडामुळे गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ३४ मतदार केंद्राचे मतदान थांबविण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान होणार आहे. यामुळे मतदान करण्यासाठी गेलेल्या शेकडो मतदारांना मतदान न करताच परत जावे लागले. तर ज्या दिवशी या मतदान केंदावर फेर मतदान घेण्यात येईल, त्या दिवशी प्रशासनाने सुट्टी जाहीर करावी. अन्यथा त्याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे खा.प्रफुल पटेल यांनी सांगितले.दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा सुरत येथून मागविण्यात आलेल्या ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिनवर आम्ही सुरूवातीपासून आक्षेप घेतला होता. त्याची रितसर तक्रार सुध्दा मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली. वांरवार ही बाब निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. तसेच निवडणूक आचार संहिता लागू असताना जिल्हाधिकाऱ्यांनी दुष्काळ निधीचे पैसे वाटप करण्यासाठी बँका सुरू ठेवण्याचे आदेश काढले होते. मात्र आम्ही तक्रार केल्यानंतर ते परत घेतले. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पटेल यांनी केली.
फेरमतदान होईपर्यंत मतमोजणी नको; प्रफुल्ल पटेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 3:36 PM
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक मतदान प्रक्रियेदरम्यान दोन्ही जिल्ह्यातील अनेक केंद्रावरील ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिन बंद असल्याने हजारो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे जोपर्यंत येथील फेरमतदान होत नाही, तोपर्यंत देशात ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत. तेथील मतमोजणी करु नये अशी मागणी खा.प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी (दि.२८) येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
ठळक मुद्देबॅलेटने घ्या निवडणूक घ्या हजारो मतदार मतदानापासून वंचित