कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपण केलेला कचरा वेचून नेताना कित्येक महिला, पुरूष व चिमुकलेही दिसतात. समाजाने त्यांना ‘कचरावाले’ ही उपाधीच देऊन टाकली आहे. त्यांचे काम व मिळालेल्या उपाधीमुळे समाजात त्यांना दर्जा राहिलेला नाही. मात्र नगर परिषद त्यांना समाजात माणूस म्हणून दर्जा मिळवून देणार आहे. यासाठी नगर परिषद त्यांना ‘स्वच्छता ताई व स्वच्छता दादा’ म्हणून संबोधणार असून त्यांच्याकडून शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी मदत घेणार आहे.शहरात सध्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. यामुळे दररोज निघणाऱ्या सुमारे ६५ मेट्रीक टन कचऱ्याची विल्हेवाट लावताना नगर परिषदेलाही घाम फुटत आहे. यातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया करून त्यापासून गांडूळ खत निर्मितीसाठी नगर परिषदेने गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग सुरू केला आहे. मात्र सुक्या कचऱ्याची समस्या ‘जैसे थे’ आहे. हा कचरा मोक्षधाम परिसरात टाकावा लागत असल्याने या परिसरालाच कचऱ्याचा विळखा बसला आहे. सुक्या कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी नगर परिषदेने एक वेगळी शक्कल लढविली आहे. या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नगर परिषद कचरा वेचणाऱ्यांची मदत घेणार आहे. कचरा वेचणारे शहरात फिरून रस्त्यावर पडलेले खरडे व प्लास्टिक वेचून उदरनिर्वाह करतात. आता न फिरता त्यांना एकाच ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात खरडे व प्लास्टीक मिळणार आहे. नगर परिषद त्यांना ते नि:शुल्क देणार असून ते विकून त्यांना पैसा मिळणार आहे. कचऱ्यातून प्लास्टीक व खरडे निघाल्यास त्यापासून नगर परिषदेला खत निर्मितीही येईल. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हे फायद्याचे ठरणार असल्याने नगर परिषद कचरा वेचणाऱ्यांची मदत घेणार आहे.‘स्वच्छता ताई-स्वच्छता दादां’चा दर्जा कचरा वेचणाऱ्यांना समाजात मान मिळावा व माणूस म्हणून त्यांनाही जगता यावे यासाठी नगर परिषदेने शहरातील सुमारे २८ कचरा वेचणाऱ्या महिला-पुरूषांचे गट तयार केले आहेत. त्यांना ओळखपत्र दिले आहे. त्यांना आता ‘स्वच्छता ताई-स्वच्छता दादा’ म्हणून संबोधले जाणार आहे.कचरा वेचणारेही माणूस आहेत. त्यांचे जीवनमान सुधारणे आणि सोबतच कचऱ्याची समस्या सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठीच त्यांची मदत घेतली जाणार आहे.- अशोक इंगळे नगराध्यक्ष, गोंदियाआपण केलेला कचरा वेचून शहराला स्वच्छ ठेवण्याचे काम कचरा वेचणारे करतात. यामुळेच कचरा वेचणारे न म्हणता त्यांना ‘स्वच्छता ताई-स्वच्छता दादा’ संबोधण्याची संकल्पना आली.
- चंदन पाटील मुख्याधिकारी, न.प.गोंदिया