गोंदिया : मागील दहा-पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. रेल्वे गाड्यांनी बाहेरून गोंदिया येथे येणाऱ्या प्रवाशांमुळे कोरोना संसर्ग वाढण्यास मदत होत आहे. कोरोना संसर्गाच्या काळात रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद होती. मात्र, प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता कोरोना नियमांचे पालन करून काही विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. पण, रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाड्यांमध्ये कोरोना नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. रेल्वे गाड्यांमध्ये अनेक प्रवासी मास्क लावत नसून फिजिकल डिस्टन्सिंगचेसुद्धा पालन करीत नसल्याचे आढळले. गोंदिया रेल्वेस्थानकाला लोकमत प्रतिनिधीने शनिवारी भेट देऊन पाहणी केली असता, अनेक प्रवासी मास्क न लावता रेल्वे स्थानकावर वावरताना आढळले, तर रेल्वेस्थानकावर तैनात असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारीसुद्धा या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आढळले. कोरोना नियमांचे पालन करण्याकडे पुन्हा दुर्लक्ष केले जात असल्याने कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वेस्थानक हे प्रमुख स्थानक असून, दररोज सध्या ३५ ते ४० गाड्या या स्थानकावरून धावत आहेत, तर तीन-चार हजार प्रवासी दररोज प्रवास करतात.
...........
जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रमुख रेल्वे गाड्या
गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस
गोंदिया-मुंबई विदर्भ एक्सप्रेस
जबलपूर- चांदाफोर्ट
गोंदिया- इतवारी
जबलपूर- इतवारी रिवा एक्सप्रेस
आझाद हिंद एक्सप्रेस
हावडा-मुंबई एक्सप्रेस
............
गोंदिया रेल्वे स्थानकावर येणाऱ्या गाड्या -४७
गोंदिया रेल्वे स्थानकावरुन जाणाऱ्या गाड्या - ४७
एकूण रेल्वे गाड्या संख्या - ९४
..........
विमा मास्क न लावणाऱ्या कारवाईकडे दुलर्क्ष
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काही नियम लागू केले आहे. रेल्वे स्थानक तसेच रेल्वे गाड्यांमध्ये विमा मास्क प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लघंन करणाऱ्यावर ५०० रुपयांचा दंड आकारला जात आहे. सुरुवातीला रेल्वे सुरक्षा बलाकडून धडक कारवाई केली जात होती. पण आता याकडे दुलर्क्ष झाल्याचे चित्र आहे.
........
कोट :
कोरोना संसर्गाच्या काळात रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहे. रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाड्यांमध्ये विमा मास्क असणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी रेल्वे स्थानकावर व्यापक स्वरुपात जनजागृती केली जात आहे.
-जनसंपर्क अधिकारी रेल्वे.