कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकशाही राज्यात एका-एका मतालाही मोठे महत्त्व असून एक मत एखाद्याचे भाग्य बनवू शकते तर हेच एक मत एखाद्याला नेस्तनाबूदही करू शकते. या एका मताव्दारेच एखादी योग्य व्यक्ती निवडून आल्यास चांगली कामे होतात. तेथेच चुकीची व्यक्ती निवडून आल्यास विकास कामांपासून क्षेत्र माघारते. यामुळेच प्रत्येकाने आपले बहुमूल्य मत योग्यरीत्या वापरावे असे सांगितले जात असून या बहुमूल्य मतांसाठीच ५ वर्षे राज्य करणारी व्यक्ती तुमच्यापर्यंत मताची मागणी करण्यासाठी येते. यामुळेच प्रत्येकाने मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य समजून नक्की मतदान करावे, असे निवडणूक आयोगाकडूनही सांगितले जाते. आता येणारा काळ निवडणुकांचा काळ राहणार असून यातूनच नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी काम सुरू झाले आहे. १ ते ३० नोव्हेंबरपर्यंत यासाठी विशेष मोहीम राबविली जात असून त्यात वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्यांना नाव नोंदविण्यासाठी संधी मिळाली आहे. यामुळे या संधीचा लाभ घेत नवमतदारांना आपले नाव नोंदवून येणाऱ्या निवडणुकांत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
अशी करा नोंदणी - आपल्या देशात वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीला मतदानाचा हक्क देण्यात आला आहे. यामुळे वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्यांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी फॉर्म क्रमांक-६ भरावयाचा आहे. या फॉर्मवर बीएलओंची सही लागते व तेच तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात हे फॉर्म जमा करतात. त्यानंतर मतदार यादीत नाव नोंदणी केली जाते. यासाठी सध्या मोहीम सुरू असून बीएलओ ही सर्व कामे करीत आहेत.
पहिल्यांदाच बजावणार मी माझा हक्क ! निवडणुकीत आतापर्यंत बॅलेटवर शिक्का मारला जात होता. मात्र आता मशीनचे बटण दाबले जात असल्याचे माहिती आहे. प्रत्यक्षात बघितले नसून आतापर्यंत मतदानाचा हक्का बजावलेला नाही. मात्र आता १८ वर्षे पूर्ण झाली असून मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अर्ज केलेला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांत मतदानाचा हक्क बजावता येणार असून त्याची उत्सुकता आहे. -विलास गुरव
निवडणुकीत मतदान कसे करतात याबाबत उत्सुकता आहे. आतापर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत होत्या. तर आता मशीनव्दारे निवडणुका घेतल्या जात आहेत. यामुळेच मतदान कसे करायचे याबाबत उत्सुकता वाढली आहे. आता यादीत नाव आले असून येत्या निवडणुकांत मतदानाचा हक्का बजावणार. -राहुल बागडे