देवरी : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हळूहळू आटोक्यात येत आहे. संचारबंदीमुळे शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य गोरगरीब लोकांना खूप त्रास झाला. मात्र, संचारबंदी हटविल्याने परिस्थिती सुधारत आहे. आता शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब सर्वसामान्यांनाकरिता असलेल्या शासनाच्या सर्व शासकीय योजनांचा लाभ गरजू लोकांना मिळवून देण्याकरिता शासकीय यंत्रनेने प्रयत्न करणे गरजेचे आहे, तरी अशा परिस्थितीत शासकीय योजनांच्या लाभापासून कोणीही वंचित राहू नये, असे निर्देश आमदार सहषराम कोरोटे यांनी दिले.
तालुक्यातील ग्राम पालांदूर (जमी.) येथे शनिवारी (दि.१२) आयोजित शेतकरी सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप भाटिया, तालुका महासचिव बळीराम कोटवार, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शकील कुरैशी, घोनाडीचे सरपंच सोनू नेताम, पालांदूरच्या (जमी.) सरपंच जयवंता हरदुले, नुरचंद नाईक, नमन गुप्ता, यशवंत गुरनुले, विठोबा लेंडे, गांधी, दुलाराम उसेंडी प्रामुख्याने उपस्थित होते.
सभेत प्रामुख्याने वनजमिनीचे पट्टे, वनजमीन अतिक्रमण, वनजमीन पट्टेधारक शेतकऱ्यांची धान खरेदी, रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभ, घरकूल-शौचालय योजनेचे देयक, शेतातील वीज कनेक्शन, मगरडोह (चुंभली) येथे बंधारा व पुलाचे बांधकाम अशा विविध विषयांवर चर्चा करून या समस्येचे त्वरित निराकरण करण्यासंबंधात आदिवासी विकासमंत्री के.सी.पाडवी, गोंदियाचे जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करून समस्या निराकारण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच वीज विभागाचे कार्यकारी अभियंता फुलसेल, अभियंता कांबळे, गटविकास अधिकारी चंद्रमणी मोडक यांच्यासह इतर संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करून, गरजू लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले. यावेळी ग्राम पालांदूर (जमी.), मगरडोह, गरारटोला, बालापूर, चंभुली, घोनाडी, सिंगनडोह व सुकडी या गावातील सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, शेतमजूर व प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.