संजय पुराम : दीनबंधू ग्रामीण विकास संस्थेतर्फे मार्गदर्शन शिबिराचे आयोजनदेवरी : सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना आपले ध्येय यशस्वी करायचे असेल तर स्पर्धा परीक्षेची उत्तम तयारी केल्याशिवाय तरणोपाय नाही, असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले. आफताब मंगल कार्यालय देवरी येथे दीनबंधू ग्रामीण विकास संस्थेद्वारे स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या वेळी उद्घाटनीय सत्राच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.यावेळी प्रतिमेच्या स्वरुपात असलेल्या महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करुन विरेंद्र अंजनकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. मार्गदर्शक न.प. मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे होते. अतिथी म्हणून न.प. उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, सभापती रितेश अग्रवाल, अनुभाई शेख, नगरसेवक यादोराव पंचमवार, प्रवीण दहीकर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शक चिखलखुंदे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची, इयत्ता बारावी नंतर पुढे काय करायचे? याबाबत मार्गदर्शन केले. तर विरेंद्र अंजनकर यांनी, या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना अशा मार्गदर्शनाचा लाभ होईल. सकारात्मक विचार करुन शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु करावी, असे सांगितले. यानंतर नियोजित सत्रानुसार प्रथम सत्रात विद्यार्थ्यांना पशुधन विकास अधिकारी डॉ. कोळेकर व वनपरिक्षेत्राधिकारी राठोड यांचे मार्गदर्शन केले. या वेळी डॉ. कोळेकर यांनी, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अभ्यासासाठी एकाग्रता निर्माण करावी. त्यासाठी काय केले पाहिजे, कुठल्या पुस्तकाचे वाचन करावे, यावर राठोड यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अभ्यासाचे छोटे-छोटे अंकगणिताचे सूत्र, स्पर्धा परीक्षा व आपले राहणीमान यांचे संबंध काय? याची माहिती दिली. समारोपीय सत्रात पोलीस निरीक्षक तटकरे यांनी विद्यार्थ्यांनी मनात कुठलीही भीती न ठेवता स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, असे सांगत अधिकारी हे सर्वसामान्य कुटुंबातच घडतात. त्यामुळे आपण सुद्धा उत्साहपूर्वक प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत सहभागी व्हावे, असे सांगितले.याच सत्रात पोलीस उपनिरीक्षक यांनी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तयारी कशी करावी, यावर मार्गदर्शन केले. शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे शिबिरासाठी विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत दरात संस्थेने स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली होती. शिबिराच्या आयोजनाबाबत उद्देश काय? यावर संस्थेचे अध्यक्ष कुलदीप लांजेवार यांनी आपल्या प्रास्ताविकात माहिती सांगितली. ते म्हणाले, देवरी तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेविषयी वातावरण नाही आणि त्यामुळे ते वातावरण निर्माण करुन राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या तालुक्यातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत यावेत व आपल्या या भागातील विकास व्हावा, याच उद्देश्यपूर्तीसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले व यापुढे करण्यात येणार आहे, असे सांगिेतले. शिबिराचे संपूर्ण संचालन जितेंद्र रहांगडाले यांनी केले. आभार प्रा.इंजि. घनश्याम निखाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे स्वयंसेवक हर्षवर्धन मेश्राम, निधील शर्मा, महेंद्र लांजेवार, सुनील गहाणे, मयुर कापगते, अरुण मानकर, गोपाल चनाप, प्रवीण बारसागडे, राधेश्याम धनबाते व इतर कार्यकारी मंडळ, सदस्य आणि नगरातील प्रतिष्ठित नागरिकांनी सहकार्य केले. शिबिरात बहुसंख्येत विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
स्पर्धा परीक्षेच्या तयारीशिवाय तरणोपाय नाही
By admin | Published: March 31, 2017 1:28 AM