गोंदिया : यंदा ऊन चांगले तापत असून त्यात पाऊसही लांबणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. अशात शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होतो; मात्र वैनगंगा नदीला पुरेपूर पाणी असून १५ जूनपर्यंत तर शहराला पाणीपुरवठा करता येणार अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून मिळाली आहे. यामुळे तोपर्यंत तरी टेन्शन नाही... कारण, वैनगंगा नदी तहान भागविणार आहे.
शहराला तालुक्यातील ग्राम डांगोरली येथील वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. यामुळेच वैनगंगेवरच शहरवासीयांची तहान अवलंबून आहे. एरवी वैनगंगा नदी पाण्याने भरून असते; मात्र उन्हाळ्यात नदीतील पाण्याची पातळी घटल्यास शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. यामुळेच उन्हाळ्यात वैनगंगेतील पाण्याची पातळी म्हटल्यास एकदम धडकी भरते अशीच स्थिती असते. त्यातही आता उन्हाळा आपल्या रंगात आला असून ‘मे हीट’ चांगलाच भाजून काढत आहे. अशात पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याच्या पातळीवर त्याचा परिणाम पडतो.
विशेष म्हणजे, मध्यंतरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नळांना पाणीपुरवठा होत नसल्याने वैनगंगेतील पाण्याची पातळी कमी तर झाली नाही अशी धडकीही नागरिकांना भरली होती. त्यात हवामान खात्याने यंदा पाऊस लांबला असल्याचा अंदाज वर्तविला आहे. अशात वैनगंगा नदीला पाणी असणे गरजेचे आहे. अन्यथा शहराच्या पाणीपुरवठ्याची समस्या उद्भवणार यात शंका नाही; मात्र दिलासादायक बाब म्हणजे, वैनगंगेत आताही पुरेपूर पाणी असून येत्या १५ जूनपर्यंत तरी पाणी पुरणार अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता नितीन तंगडपल्लीवार यांनी दिली. यामुळे शहरवासीयांना घाबरण्याचे कारण नसून वैनगंगा शहरवासीयांची तहान यंदाही उन्हाळ्यात भागविणार आहे.
पुजारीटोलातील पाण्याची गरज पडणार नाही
सन २०१८ व २०१९ मध्ये वैनगंगा नदी आटली होती व परिणामी गोंदिया शहराची तहान भागविण्यासाठी सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. त्या काळाची आठवण करताच आताही तोंडचे पाणी पळून जाते अशी स्थिती आहे; मात्र सुदैवाने यंदा सध्या तरी वैनगंगेला पुरेपूर पाणीसाठा असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून मिळाली. यामुळे यंदाही पुजारीटोलातील पाण्याची गरज पडणार नाही अशी सध्या तरी शक्यता वर्तविली जात आहे.
नव्याने बंधारा बांधणार
वैनगंगा नदीतील पाणी वाहून जाऊ नये यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून वेळीच खबरदारी घेत नदीवर रेती पोतींपासून बंधारा बांधण्यात आला होता; मात्र बरसलेल्या अवकाळी पावसामुळे नदीला चांगले पाणी आले व तो बंधारा वाहून गेला. यामुळे नदीतील पाणी अडवून ठेवण्यासाठी परत बंधारा बांधला जाणार आहे. जेणेकरून नदीत पाणीसाठा रहावा व शहराच्या पाणीपुरवठ्याची सोय व्हावी. यात एक बाब चांगली झाली की, अवकाळी पावसामुळे हातभार लागला असून नदीला पाणी आले व आता तेच पाणी शहराला पुरवठा करण्याच्या कामी येत आहे.
वैनगंगा नदीला सध्या पुरेपूर पाणी असून येत्या १५ जूनपर्यंत तरी पाणीपुरवठा करता येणार असा अंदाज आहे; मात्र तरीही शहरवासीयांनी पाण्याचा वापर जपूनच करावा. पाण्याची नासाडी होणार नाही याची दक्षता घेऊन सहकार्य करावे.- नितीन तंगडपल्लीवार, उपविभागीय अभियंता, मजिप्रा.