कलावंतांना आर्थिक मदत देण्याची मागणी
तिरोडा : जिल्ह्यातील नाटक, तमाशा, गोंधळ, भारूड यासारख्या इतर कलेच्या कलावंतांना एक विशेष बाब म्हणून आर्थिक मदत करणारा लोक कल्याणकारी धोरणात्मक निर्णय घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नाटक, तमाशा, गोंधळ, भारूड या कलेने कलावंत श्रोत्यांचे मनोरंजनास प्रबोधनाचे महान कार्य करीत आहेत. कलेच्या सादरीकरणातून जी मिळकत मिळते त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.
वातावरण बदलांमुळे आजारांची भीती
गोंदिया : कोरोना विषाणू महामारीचे संकट घोंगावत असतानाच, अचानक होत असलेल्या वातावरणातील बदलांमुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखीसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. कोरोनामुळे नागरिक अगोदरच घाबरलेले आहेत. त्यात सर्दी, खोकला किंवा ताप आल्यास नागरिक कोरोनाची धास्ती घेत आहेत.
प्रखर दिव्यांमुळे अपघाताची शक्यता
गोंदिया : दुचाकी व चारचाकी वाहनांच्या प्रखर दिव्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. काही वाहनचालक साधे दिवे न लावता निळ्या रंगाचे तसेच प्रखर दिवे लावत असल्यामुळे समोरील वाहनाला त्याचा त्रास होतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी प्रखर दिवे लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून अपघाताला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गावागावातील हातपंप नादुरुस्त
गोंदिया : जिल्ह्यातील गावागावात असलेले बहुतांश हातपंप नादुरुस्त असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईत आणखी भर पडत आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून अनेक ठिकाणी हातपंप बसविण्यात आले आहेत. मात्र, ते नादुरुस्त असल्याने अडचणी वाढल्या आहेत. आता उन्हाळा चांगलाच तापायला सुरुवात झाली असून पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. अशात हे हातपंप दुरुस्त करण्याची गरज असून तशी मागणी केली जात आहे.
शहरातील पथदिवे दिवसा सुरूच
तिरोडा : येथील पथदिवे दिवसासुद्धा सुरू राहतात. याकडे स्थानिक न.प.चे दुर्लक्ष असून सर्वसामान्य जनतेला त्या विद्युत बिलाचा अधिभार सहन करावा लागतो. पथदिवे दिवसादेखील सुरू असतात. याकडे न.प. कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. पथदिव्यांमुळे सर्वसामान्यांना अधिभार जास्त सोसावा लागत आहे.
किसान सन्मान योजनेपासून वंचित
गोंदिया : कोरोना संकटकाळात दिलासा मिळावा, यासाठी सरकारने किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला. काहींना लाभ मिळाला. मात्र, काही अद्यापही वंचित आहेत.
बँकांत दलालांकरवी होतेय फसवणूक
सडक-अर्जुनी : तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तत्काळ होत असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. कामे करवून घेण्यासाठी दलालांना पैसे द्यावे लागत असल्याने नागरिक फसत आहेत.
मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी
आमगाव : स्थानिक परिसरातील शेतशिवारात अनेक मोकाट कुत्रे असून, हे कुत्रे एकटी महिला किंवा पुरुष पाहून हल्ला करतात. पाळीव जनावरांनाही ते जखमी करत असतात. यामुळे नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण होत आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
कचरापेट्यांची व्यवस्था करावी
तिरोडा : येथील सहकारनगरात नगर परिषदेच्या वतीने कचरापेट्या ठेवण्यात न आल्याने ठिकठिकाणी कचरा पसरलेला दिसतो. पावसामुळे कुजलेल्या कचऱ्यामुळे किड्यांचा प्रकोप वाढला असून, आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. कचरापेट्यांची मागणी होत आहे.
दुग्ध व्यवसाय डबघाईस
अर्जुनी-मोरगाव : देशाची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व दुग्ध व्यवसाय केला जातो. परंतु, आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन घटत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय डबघाईस आला आहे. १०-१५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्याकडे गायी-म्हशी असायच्या. परंतु आता पशुधनात प्रचंड घट झाली आहे.
राइस मिल ठरत आहेत धोकादायक
गोरेगाव : राज्य मार्गावर असलेल्या राइस मिलमुळे वाहनचालकांच्या डोळ्यांत धानाचा कोंडा उडत आहे. त्यामुळे डोळ्यांत कचरा जाऊन वाहनचालकांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक
तिरोडा : तालुक्यातील अनेक ठिकाणी वीज कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. या उघड्या डीपींमधून वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे त्यापासून केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता आहे.
नाल्यांअभावी पाणी वाहते रस्त्यांवरून
नवेगावबांध : ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते करण्यात आले. मात्र, पुरेशा नाल्या खोदल्या नाहीत. ज्या ठिकाणी नाल्या खोदल्या, तेथील नाल्याही बुजवून टाकल्याने सांडपाणी थेट रस्त्यांवरून वाहते.
ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे
गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) ग्रामीण भागामध्ये १ लाख किलोमीटर लांबीचे पांदण रस्ते व इतर खडीकरण रस्ते निर्मितीचा संकल्प करण्यात आला आहे.
प्रदूषण रोखण्यास मंडळाचे दुर्लक्ष
आमगाव : वाहनांना कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भर रस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. प्रेशर हॉर्न वापरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई होत नाही.