संतोष बुकावन ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : नवेगावबांध-कोहमारा राज्य महामार्गावर परसोडी हे गाव आहे. डोमाटोली, वडगुरेटोली, परसोडी, रामनगर, पांढरवानी रैयत, झोडेटोली, पांढरवाणी माल, चान्ना कोडका व खोली अशा ९ गाव व टोल्या मिळून परसोडी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतमधील लोकसंख्या ३३४७ आहे. ग्रामपंचायत अंतर्गत गावांची विचित्र रचना आहे. सुमारे ७ कि.मी. अंतरावर असलेले चान्ना कोडका हे गाव परसोडी ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट आहे. एक मात्र धक्कादायक बाब अशी आहे की, या ग्रामपंचायतमधील डोमाटोली येथे विजेची सुविधा अद्यापही नाही.२००५ चे सुमारास परसोडी या गावात संयुक्त कुटुंबातील लोकांना राहायला जागा नाही म्हणून त्यांनी पर्याय शोधला व गावाबाहेर असलेल्या एका जागेवर १३ कुटुंबीयांनी राहूट्या तयार केल्या. २००७ मध्ये प्रशासनाने हे अतिक्रमण हटविले. मात्र पूर्णनिर्धाराने २०१० मध्ये पुन्हा १३ कुटुंबीयांनी तिथे राहूट्या तयार करुन वास्तव्यास सुरुवात केली. या संपूर्ण प्रक्रियेत सुमारे १४ वर्षांचा काळ लोटला. हाल अपेष्ठा सहन करत हे कुटुंबीय येथे राहात आहे. मात्र अद्यापही येथे मुलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. २००५ चे पूर्वी या जागेवर पुस्तोडे नामक इसमाने शेतजमिन तयार करुन अतिक्रमण केले होते.राज्यमार्गापासून सुमारे ४०० मिटरवर ही वस्ती आहे. मात्र या वस्तीत जायला धड रस्ता नाही. माती काम होऊन कच्चा रस्ता तयार करण्यात आला. मात्र पावसाळ्यात या रस्त्याने जाता येत नाही. चिमुकली शाळकरी पोरं चिखलातून ४०० मीटर अंतर कापून राज्य मार्गावर येतात व तिथून ३ कि.मी.अंतरावरील परसोडीच्या शाळेत पोहोचतात. पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था एवढी बिकट असते की वस्तीतील मोठी माणसं आपल्या दुचाकी अर्धा कि.मी.वर ठेवून पायी पायी वस्तीत पोहोचतात. म.रा.वीज वितरण विभाग नवेगावबांध कार्यालयाने सर्वेक्षण केले. वीज पुरवठ्यासाठी घर कर पावती, १०० रुपयाचा मुद्रांकपेपर व आवेदन पत्र भरुन दिले. मात्र वी पुरवठा करण्यात आला नाही. या कार्यालयात चौकशी केली तर तहसीलदाराने या वस्तीत पुरवठा करु नये असे पत्र दिल्याचे ते सांगतात. या पत्राची मागणी केली तर ते दिसत नसल्याचा देखावा निर्माण करतात, असा या वस्तीतील रहिवाशांचा आरोप आहे. १३ कुटुंबीय गेल्या १४ वर्षापासून वीज सुविधेच्या प्रतिक्षेत आहेत.मागील जि.प.निवडणुकीचे वेळी जि.प. सदस्या रचना गहाणे यांनी मुलभूत सुविधा पुरवण्यिाचे आश्वासन दिले होते. त्यांनी या वस्तीत एक हातपंप दिल्याने पिण्याच्या पाण्याची सुविधा झाली. केवळ एका हातपंपावर त्यांनी बोळवण केली. मात्र आजही येथील मुलभूत प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. घर तिथे शौचालय असे शासनाचे धोरण आहे. मात्र परसोडी ग्रा.पं.ने येथील केवळ ४ लाभार्थ्यांना शौचालय दिले.अद्यापही ९ लोकं शौचालयाच्या प्रतिक्षेत आहेत. या वस्तीत दोन घरकुल मंज़ूर झाले खरे. त्यांना घरकुलाचा पहिला हप्ता मिळाला. मात्र फेब्रु. २०१८ मध्ये मंजूर झालेल्या या घरकुल धारकांना कार्यारंभ आदेशच मिळाला नाही. अतिक्रमणाची जागा असल्याचे घरकुल अडकले असल्याचे सांगण्यात येते. वीज नसल्याने वस्तीवासीयांची मोठी अडचण होत आहे. रात्री दिवे लावण्यासाठी केरोसिन मिळत नाही. खाद्यतेल जाळून या वस्तीत रात्रभर दिवे जळतात हे वास्तव आहे. एकीकडे शासन पंतप्रधान आवास योजनेंतर्गत भूखंड खरेदी व घरबांधकामासाठी पैसे देतो. सर्वांना घरे देण्याचे गाजर दाखविले जाते. मग या वस्तीत घरकुल का दिले जात नाही हा खरा प्रश्न आहे.‘‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’ हा मंत्र देशवासीयांना दिला. सारे जग शहरांकडे धावतोय. शहरी जीवन हे अत्यंत धावपळीचे झालयं. शहरवासीयांजवळ कुणाशीही बोलण्यासाठी अजिबात वेळ नाही. मात्र ग्रामीण भागातले चित्र अगदी विपरित आहे. परसोडी ग्रामपंचायत अंतर्गत येथील ग्रामस्थ गावात राहायला जागा नाही म्हणून शहरांकडे धाव न घेता उलट जंगलाकडे धाव घेऊन गांधीजींच्या मुलमंत्राचे पालन करताना दिसताहेत. मात्र हे करताना त्यांना स्मार्ट ग्राम, शायनिंग इंडिया, डिजीटल इंडिया अशी मुक्ताफळे उधळून स्वप्न दाखविणाऱ्या राज्यकर्त्यांच्या राजवटीत वीज नसलेली वस्ती असावी ही खरी शोकांतिका आहे’’मुलभूत सुविधांना प्राधान्य-कुंभरेया वस्तीत मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने ग्रामसभेत १२ वीज खांब, रस्ता व पिण्याच्या पाण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. ही जागा वादग्रस्त असल्यामुळे येथे बांधकाम करु नका, असे वस्तीवासीयांना सांगितले होते. तरी सुद्धा त्यांनी बांधकाम केले. या वस्तीत मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी प्राधान्य राहील,अशी माहिती सरपंच अनिल कुंभरे यांनी लोकमतशी बोलतांना दिली.
वीज नसलेली वस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 10:06 PM
नवेगावबांध-कोहमारा राज्य महामार्गावर परसोडी हे गाव आहे. डोमाटोली, वडगुरेटोली, परसोडी, रामनगर, पांढरवानी रैयत, झोडेटोली, पांढरवाणी माल, चान्ना कोडका व खोली अशा ९ गाव व टोल्या मिळून परसोडी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतमधील लोकसंख्या ३३४७ आहे.
ठळक मुद्देप्रशासनाचे वेळकाढून धोरण । चौदा वर्षांपासून विजेची केवळ प्रतीक्षाच