सालेकसा : आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त कार्यालय स्तरातून सन २०२१ मध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे समुपदेशनाने बदल्या करण्यात आल्या. त्यानुसार बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना २० ऑगस्ट २०२१ पर्यंत कार्यमुक्त करणे गरजेचे होते. परंतु १५ दिवस लोटूनसुद्धा त्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश न मिळाल्याने संबंधित कर्मचारी कमालीचे संतप्त झालेले आहेत. या विरोधात येत्या ५ सप्टेंबर शिक्षक दिनापासून नागपूर आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषणवर बसणार आहेत.
देवरी प्रकल्प अंतर्गत आदिवासी व अतिदुर्गम भागात अनेक वर्षांपासून बरेच कर्मचारी आपली सेवा देत आहेत. यावर्षी समुपदेशनाने झालेल्या बदल्यांमुळे त्यांना न्याय मिळाला. परंतु बदली होऊन ही प्रकल्प अधिकारी कार्यालयाने त्यांना कार्यमुक्त केले नाही. अशात संबोधित शिक्षकांनी आश्रमशाळा शिक्षकांची सीआयटीयू संघटनेशी संपर्क केला. संघटनेमार्फत नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागो गाणार यांच्याकडे धाव घेतली. तसेच ३१ ऑगस्टपर्यंत कार्यमुक्त करावे, असे निवेदन दिले. परंतु आजपर्यंत कार्यमुक्तीचे आदेश मिळाले. त्यामुळे आता नाईलाजाने आ. गाणार यांच्या पुढाकाराने पीडित कर्मचारी बेमुदत उपोषणावर जाण्याचा इशारा आर.टी. खवशी, सचिव अमृत मेश्राम, जी.बी.सोनोने, एल.एस. पडवेळर यांनी दिला आहे.