गोंदिया : शहरातील लोकसंख्येसह वाहनांच्या संख्येतसुद्धा भर पडत आहे. त्यामुळे वाहने ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे शहरातील अपघातांच्या संख्येतसुद्धा वाढ झाली आहे. नगर परिषदेने शहरातील मुख्य रस्त्यांचे सिमेंटीकरण करून त्यांचे रुंदीकरण केले. मात्र, गोरेलाल चौक, दुर्गा चौक, श्री टॉकीज चौक, चांदणी चौक, गांधी चौक, नेहरू चौक या परिसरातील दुकानांसमोर रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने या भागात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. दुर्गा चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर काही वाहनमालक आपली चारचाकी वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी करून ठेवतात. त्यामुळे या मार्गावरून वाहने काढताना मोठी कसरत करावी लागते. यावर तोडगा काढण्यासाठी नगर परिषद आणि वाहतूक नियंत्रण विभागाने अनेकदा प्रयत्न केला; पण त्यांना अद्यापही यश आलेले नाही. शहराची लोकसंख्या दीड लाखावर असून, दुचाकी वाहने ६५२७६, तर चारचाकी वाहनांची संख्या ३५४७६ आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येतसुद्धा दरवर्षी भर पडत आहे. मात्र, त्या तुलनेत रस्त्यांची रुंदी वाढत नसल्याने वाहतुकीच्या कोंडीची समस्या कायम आहे. शहरातील अनेक नागरिकांनी चारचाकी वाहने खरेदी केली आहेत; पण ती वाहने ठेवण्यासाठी जागा नसल्याने ते सर्रासपणे आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी करून ठेवतात. तर शहरातील बाजारपेठेतील रस्त्यांची सुद्धा हीच अवस्था आहे. रस्त्याच्या दुतर्फा दुकानासमोर वाहने उभी करून ठेवली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी हाेऊन अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे.
.......
गोरेलाल चौक, दुर्गा चौक परिसरात सर्वाधिक कोंडी
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गोरेलाल चौक, दुर्गा चौक, रेल्वे स्टेशन या भागात सातत्याने वाहनांची वर्दळ असते. मात्र, याच भागात वाहन पार्किंगची सर्वाधिक समस्या आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करून ठेवली जातात, तर काही चारचाकी वाहन मालक आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवतात. त्यामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतुकीची कोंडी होते. यामुळे वाहन चालक व शहरवासीय सुद्धा त्रस्त झाले आहेत; पण यावर तोडगा काढण्यात नगर परिषद आणि वाहतूक नियंत्रण विभाग अपयशी झाले आहे.
.....
वन-वे पार्किंगचा प्रयोग फसला
शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सम-विषय व वन-वे पार्किंगचा प्रयोग राबविला. मात्र, हा प्रयोगसुद्धा जास्त दिवस टिकू शकला नाही. रस्त्यावर वाहने उभे करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण विभागाने दंडात्मक कारवाई केली, तर काहीजणांची वाहनेसुद्धा जप्त केली; पण या मोहिमेतसुद्धा सातत्य न ठेवल्याने पुन्हा जैसे थे चित्र निर्माण झाले आहे. वन-वे पार्किंग आणि सम-विषम पार्किंग दिवसाचा प्रयोगसुद्धा फसला आहे.
......
कारवाई करण्याचा अधिकार, पण अंमलबजावणी करणार कोण?
रस्त्यावर वाहने उभे केल्यास वाहनचालकांवर कलम १२२ अतंर्गत वाहतूक नियंत्रण पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार आहे; पण याची अंमलबजावणी करणार कोण असा सवाल आहे. वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे शहरात अधूनमधून यासाठी मोहीम राबविली जाते; पण त्यानंतर पुन्हा याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने समस्या कायम आहे.
.....
शहराची एकूण लोकसंख्या
१ लाख ५० हजार २५२
दुचाकींची संख्या
६५,२३४
चारचाकी वाहनांची संख्या
४२,३४६
........