अमरचंद ठवरे
बोंडगावदेवी : निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेली भात शेती दरवर्षी दगा देत असल्याने तोटाच सहन करावा लागत आहे. यात काही बदल करीत विहिरगाव/बर्ड्या येथील विश्वनाथ व त्यांच्या खांद्याला खांदा लावून भक्कमपणे साथ देणारी सहचारिणी विशाखा वालदे यांनी दोन एकरात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले आहे. दिवस-रात्र राबराब राबून पीक हातात आले. हाती आलेला भाजीपाला दररोज तालुक्यात विक्री करतात. परंतु कमी भावाने मालाची विक्री होत असल्याने हातामध्ये दमडीही लागत नसल्याचे विशाखा विश्वनाथ वालदे यांनी सांगितले.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विहिरगाव (बर्ड्या) येथील विश्वनाथ वालदे मागील काही वर्षांपासून भात पिकाची लागवड न करता नावीन्यपूर्ण पिके घेण्यात त्यांचा नावलौकिक आहे. अख्ख्या कुटुंबाला त्यांनी प्रयोगशील शेती करण्यात झोकून दिले. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतशिवारात त्यांनी छोटेसे घर बांधून कायमस्वरुपी वास्तव्याने राहत आहेत. सध्या पावसाळी हंगामात त्यांनी भेंडी, दोडका, चवाळीच्या शेंगा, वांगी, काकडी या पिकांची लागवड केली. मांडव पद्धतीने काकडी पिकाची लागवड अर्धा एकरात केली होती. निसर्गाच्या कोपाने काकडीचा मांडवच खाली कोसळला. संपूर्ण पीक उदध्वस्त झाल्याने जवळपास दोन लाखांचे नुकसान झाल्याचे विश्वनाथ वालदे यांनी सांगितले. तंत्रशुद्ध यांत्रिकी पद्धतीने संपूर्ण कुटुंबातील सदस्य शेती करून स्वत:च राबतात.
बॉक्स.....
राबराब राबून हातात दमडीही नाही
हाती आलेला भाजीपाला तोडण्यासाठी सकाळच्या पाळीत महिला मजूर शेतात राबतात. सकाळी ६ पासून ८ पर्यंत भाजीपाला तोडला जातो. पॅकिंग व वजन काटा करून तालुक्याच्या बाजारात उत्पादित केलेला भाजीपाला नेला जातो. व्यापारी कमी भावाने मालाची खरेदी करतो. सध्या दोडका १५ ते २० रुपये किलो, चवळी शेंगा १० ते १५ रुपये किलो, भेंडी ५ ते १० रुपये किलोप्रमाणे विकून घरची वाट धरावी लागते. कमी भाव, निसर्गाचा कोप, विद्युत विभागाचा कानाडोळा त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही, अशी व्यथा वालदे यांनी मांडली.