लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासनाने मोहीम हाती घेतली आहे. यासाठी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात येणार असून यासाठी प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देण्यात आले. गोंदिया जिल्ह्याला दररोज ३२६० चाचण्या करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. पण तेवढ्या चाचण्या करण्याची क्षमता आणि किट्सच उपलब्ध नसल्याने एवढ्या चाचण्या पूर्ण करायच्या कश्या असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी जिल्ह्याला ६५ टक्के आरटीपीसीआर आणि ३५ टक्के रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र हे उद्दिष्ट अधिक असून दररोज ३२६० चाचण्या करण्याची क्षमताच नाही. जिल्हा आरोग्य विभागाकडे १० किट्स उपलब्ध आहेत. दररोज ३२६० टेस्ट केल्या तर तेवढ्या किट्स असणे गरजे चे आहे. तर मनुष्यबळ देखील तेवढे हवे आहे. मात्र यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने शासनाने दिलेल्या उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन सुरु केले आहे. त्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.
जिल्ह्याच्या तुलनेत उद्दिष्ट अधिक असल्याने समस्याशासनाने जिल्ह्याला दररोज ३२६० कोरोना चाचण्या करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. हे उद्दिष्ट नागपूर जिल्ह्यापेक्षा अधिक आहे. गोंदिया सध्या दररोज ८५० टेस्ट केल्या जात आहे. तर दररोज १३०० टेस्ट करणे शक्य आहे. मात्र ३२६० चाचण्या करण्यासाठी आवश्यक साहित्य आणि मनुष्यबळ देखील उपलब्ध नाही. त्यामुळे यात अडचण आहे.
निधीची अडचण नाही कोरोना चाचण्यासाठी लागणारे किट्स तसेच इतर साहित्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिल्या जाते. शासनाने दिलेले ३२६० चाचण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सध्या निधीची तरी कुठलीच अडचण नाही. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना सुरु केल्या आहे. त्यामुळे दररोज अधिकाधिक चाचण्या केल्या जातील.
शासनाने जिल्ह्याला ३२६० कोरोना चाचण्या दररोज करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाला आवश्यक सूचना केल्या आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी किट्स तसेच आवश्यक सर्व साहित्य व किट्स उपलब्ध करुन दिल्या जातील. कुठलीही अडचण येणार नाही. - दीपक कुमार मीना, जिल्हाधिकारी