गोंदिया : शासनाच्या महसूल विभागाकडून दिलेल्या मोबाइल ॲपवर ई-पीक पाहणीची नोंद न केल्यास, शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे, नोंद न केल्यास शेती पडीक अथवा पेरणी केलीच नाही, असे गृहीत धरले जाणार आहे. पीककर्ज घेताना अनेक अडथळे येण्याची शक्यता आहे, याशिवाय नैसर्गिक आपत्तीने हानी झाल्यास मिळणारी नुकसान भरपाई, पीकविमा, वन्य प्राण्यांनी नासाडी केल्यास मिळणाऱ्या अर्थसाह्याला शेतकऱ्यांना मुकावे लागण्याची वेळ येऊ शकते.
गोंदिया जिल्ह्यात शासन नोंदीनुसार, २ लाख ७२ हजार १७८ शेतकरी आहेत. त्यात एकूण क्षेत्राच्या १ लाख ७८ हजार १८ हेक्टरमध्ये धानाची लागवड करण्यात आली आहे, तर ५ हजार ६९५ हेक्टर क्षेत्रात तूर, ६७ हेक्टरमध्ये मका, तीळ ९०० हेक्टर, ऊस ७०० हेक्टर, कापूस २ हेक्टर, भाजीपाला ६५० हेक्टर, हळद २८४ हेक्टर, आले ११३ हेक्टर, केळी व पपई ३० हेक्टर, तर २५ हेक्टर क्षेत्रात सुगंधित वनस्पतीची लागवड करण्यात आल्याची नोंद कृषी विभागाच्या अहवालात आहे. असे असताना जिल्ह्यात आतापर्यंत ७५ हजार ७६२ खातेदार शेतकऱ्यांनी मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्याची नोंद करण्यात आली आहे. पैकी ७० हजार ८१२ शेतकरी सक्रिय असून, ४ हजार ९५० खातेदार शेतकरी निष्क्रिय असल्याची नोंद आहे. एकंदरित जिल्ह्यातील सात बाराधारक नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या पाहता, आतापर्यंत ई-पीक पाहणी मोबाइल ॲप्लिकेशन डाऊनलोड केलेल्या शेतकऱ्यांची संख्या तोकडी आहे. आता सदर नोंदणी करण्याची मुदत काही दिवस शिल्लक असल्याने, बऱ्याच शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीपासून मुकावे लागण्याची लागण्याची शक्यता आहे.