बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या दुप्पटच
६०३ बाधितांनी केली मात : ३९७ रुग्णांची नोंद, ८ बाधितांचा मृत्यू
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांवर मात करणाऱ्यांचा आलेख सातत्याने उंचावत असून बाधितांच्या संख्येत घट होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यत येत असल्याचे चित्र असून नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केल्यास जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही हे निश्चित आहे.
गुरुवारी जिल्ह्यात ६०३ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ३९७ नवीन रुग्णांची नोंद झाली. ८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाधित रुग्णांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या दुप्पट असल्याने संसर्ग आटोक्यात असून नागरिकांनी पुन्हा अधिक काळजी घेण्याची गरज आहे. गुरुवारी आढळलेल्या ३९७ कोरोनाबाधितांमध्ये सर्वाधिक १९९ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ६७, गोरेगाव ३८, आमगाव १५, सालेकसा २२, देवरी १७, सडक अर्जुनी २२, अर्जुनी मोरगाव ५ आणि बाहेरील १२ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १,३७,७६८ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी १,१२,७०७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत १४०६६६२ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी १२०९०४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३५,७३७ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी ३०,७१२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ४४३९ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर २९४२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
.........
रुग्ण बरे होण्याचा दर ८५.२२ टक्के
मागील महिन्यात कोरोनाबाधितांचा आलेख सातत्याने उंचावत होता. त्यामुळे कोरोनाचा पाॅझिटिव्हिटी रेट २५ टक्क्यांच्या वर गेला होता. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणसुद्धा कमी झाले होेते. मात्र मागील सात-आठ दिवसांपासून रुग्णसंख्येत घट होत आहे. मात करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर ८५.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
.......
आठ दिवसांत वाढणार चाचण्यांची संख्या
येथील मेडिकलच्या प्रयोगशाळेत येत्या तीन-चार दिवसांत आरटीपीसीआर मशीन कार्यान्वित होणार आहे. त्यानंतर दररोज ३ हजारांवर स्वॅब नमुने तपासणी केले जाणार आहेत. त्यामुळे चाचण्यांची संख्यासुद्धा वाढविण्यास मदत होणार आहे. मागील दोन दिवसांपासून स्वॅब नमुने तपासणीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे.