गोंदिया : तुकडाबंदी आदेशाच्या उल्लंघनप्रकरणी शेकडो नागरिकांना हजारो रुपयांचा दंड भरण्याचे नोटीस तहसील कार्यालयाने बजावले आहे. नोटिसांमुळे नागरिकांत कमालीची दहशत पसरली असून या प्रकरणात हस्तक्षेप करून नोटीस मागे घेण्याकरीता जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडे मागणी करण्यात आली आहे.
गोंदिया तालुक्यातील गावांमध्ये महसूल विभागाने तुकडा बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत २१ हजार २५० रुपयांचा दंड भरण्याचे नोटीस शेकडो शेतकऱ्यांना बजावले आहे. ७ दिवसांच्या आत दंडाची रक्कम न भरल्यास उपविभागीय अधिकारी यांच्याकडून करण्यात आलेले फेरफारचे आदेश रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेकडो नागरिकांनी जमिनीची खरेदी करून दुय्यम निबंधक कार्यालयात नियमांनुसार रजिस्ट्री करून त्या जमिनीवर घर बांधून १२ ते १५ वर्षांपासून वास्तव्यास आहेत. तुकडा बंदी कायद्यांतर्गत हा प्रकार अयोग्य होता तर संबंधित परिसरातील तलाठी कार्यालयाने जमिनीच्या खरेदी-विक्रीकरीता कागदपत्रे उपलब्ध का करून दिली, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
त्याचप्रकारे दुय्यम निबंधकांनी रजिस्ट्री का केली, असाही सवाल उपस्थित करण्यात येत आहे. नागरिकांनी पै-पै गोळा करून जमीन खरेदी केली व त्या जमिनीवर घर बांधून राहणे सुरू केले. त्यांनतर आता दंड ठोठावण्यात आला असल्यामुळे नागरिकांत रोष आहे. कोरोना काळामुळे अनेकांचा रोजगार बुडाला व आर्थिक परिस्थिती खराब आहे. असे असताना देखील दंड ठोठावला असल्याने जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात हस्तक्षेप करून नोटीस परत घेण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रात्रंदिवस कष्ट करून पैसा गोळा केला व त्यातून जमीन खरेदी करून घर बांधले. रजिस्ट्रीकरीता शासनाला हजारो रुपयांचा महसूल दिला. तुकडाबंदी कायद्यांतर्गत गुन्हा होता तर जमिनीची खरेदी-विक्री करताना त्याचवेळी मज्जाव का केला नाही. यात आमचा काय दोष? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.