बँक आॅफ इंडिया : परिसरातील ग्राहकांना फटकागोंदिया : तिरोडा तालुक्यातील परसवाडा येथे बँक आॅफ इंडियाची शाखा आहे. या शाखेत रोकड काढण्यासाठी एटीएम मशिन लावण्यात आली आहे. मात्र गेल्या आठवडाभरापासून या एटीएममधून चलनाबाहेर असलेल्या ५०० च्या नोटा ग्राहकांना मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार घडत असून ग्राहकांची यामुळे चांगलीच कोंडी होत आहे.या प्रकाराबाबत सदर बँक शाखेचे व्यवस्थापक रविंद्र रिंगनगावकर यांच्याशी संपर्क साधला असता, सदर एटीएममध्ये नोटांचा पुरवठा करण्यासाठी स्टेट बँकेच्या माध्यमातून एका खासगी एजंसीला काम देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या बँकेतून नोटांचा पुरवठा करण्यात येतो तेथे या प्रकाराबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांनी सांगितले की, आम्ही एटीएमसाठी केवळ नवीन व चांगल्या नोटाच पाठवितो. मग चांगल्या नोटांऐवजी खराब व चलनाबाहेरील नोटा एटीएममधून कशा निघतात असा प्रश्न निर्माण झाला होता. हा सर्व प्रकार नोटा पुरविणाऱ्या खासगी एजंसीच्या एजंटद्वारे होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र या प्रकाराने परसवाडा क्षेत्रातील बँकेच्या ग्राहकांना मोठाच आर्थिक फटका बसत आहे. एकीकडे बँकेकडून काही नोटांना चलनाबाहेर करण्यात आले. सदर नोटा स्टेट बँकेशिवाय कोणतीही बँक स्वीकारत नाही. त्यामुळे सर्वसाधारण व्यवहारातूनही या चलनाबाहेरील नोटा हद्दपार झाल्या असून त्यांची देवाणघेवाण बंद झाली आहे. दुसरीकडे परसवाडा येथील बँक आॅफ इंडियाच्या एटीएममधून चलनाबाहेरील नोट, रंगविलेल्या नोटा, कुरतडलेल्या नोटा ग्राहकांना मिळत आहेत. पाच दिवसांपूर्वी अर्जुनी येथील निलकंठ साकुरे या ग्राहकाने एटीएममधून पैसे काढले. त्यावेळी त्यांना चलनाबाहेर असलेल्या पाचशेच्या चार नोटा मिळाल्या. त्यांनी गोंदिया येथे व्यवहारात चलनासाठी त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केला असता अनेक ठिकाणी त्यांची अडवणूक झाली. अनेकांनी नोटा चालत नसल्याचे सांगून त्यांना परत पाठविले. ही बाब साकुरे यांनी बँक आॅफ इंडिया शाखा परसवाडाचे व्यवस्थापक रिंगनगावकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी वरिष्ठांकडे करण्याचे सूचविले. मात्र या प्रकारामुळे परसवाडा परिसरातील बँक ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.
परसवाड्याच्या एटीएममधून निघाल्या चलनाबाहेरील नोटा
By admin | Published: July 23, 2014 11:40 PM