कौशिकी चक्रवर्ती यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय गायन यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायन कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता यवतमाळ येथील बाबूजींचे समाधी स्थळ असलेल्या ‘प्रेरणास्थळा’वर करण्यात आले आहे. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे संगीत, कला, निसर्ग आदींवर निस्सीम प्रेम होते. आयुष्यभर त्यांनी आपले संगीत प्रेम जोपासले. त्यामुळेच दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनाला संगीतमय आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी कौशिकी चक्रवर्ती यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक अजय चक्रवर्ती आणि अंजना चक्रवर्ती यांची कन्या कौशिकी आपल्या असामान्य गायन शैलीने यवतमाळकरांना मंत्रमुग्ध करणार आहे. या शास्त्रीय मैफलीत त्यांना तबल्यावर संदीप घोष साथ देणार असून हार्मोनियमवर अजय जोगळेकर राहणार आहेत. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (प्रतिनिधी)
२४ नोव्हेंबर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृती आयोजन
By admin | Published: November 19, 2015 2:30 AM