पत्रपरिषद : विदर्भ माझा पक्षाचा निर्धार हिंगणघाट : विदर्भ राज्याची निर्मिती देशातील अर्ध्यापेक्षा अधिक राज्यांपेक्षा सर्वच निकषांवर सरस व सक्षम ठरणार आहे. विविध राजकीय पक्ष विदर्भाच्या मागणीवर उघडे पडल्याने आता विदर्भाची लढाई बॅलेटच्या माध्यमातून लढण्याचा निर्धार विदर्भ माझा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला. स्थानिक शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी अनेक दशकापासून विविध राजकीय पुढाऱ्यांनी आंदोलने केलीत. पण यश आले नाही. विदर्भ राज्याची मागणी फार जुनी आहे. कॉग्रेसने विदर्भाचा विषय रेटला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारी विरोध करीत आहे, तर शिवसेना व मनसे यांचा विदर्भाच्या मागणीला विरोधच आहे. भाजपाने गत निवडणुकीत विदर्भ राज्याच्या मागणीचे समर्थन करून यश मिळविले. पण दोन वर्ष लोटूनही स्वतंत्र विदर्भासाठी अद्याप सकारात्मक पावले उचललेली नाही. विदर्भाच्या प्रश्नावर भाजपा नेत्यांच्या वक्तव्यात एकमत नाही. त्यामुळे विदर्भातील जनतेचा भ्रम निरास होत असल्याने आता बॅलेट द्वारेच विदर्भाची लढाई लढण्याची हीच योग्य वेळ असल्याचे तिरपुडे यांनी सांगितले. यासाथी सातत्याने जनजागृती करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेला विदर्भ माझा पक्षाचे उपाध्यक्ष इंद्रजीत आमगावकर, सरचिटणीस मंगेश तेलंग, प्रवीण राऊत, नागपूर जिल्हा अध्यक्ष नाना ठाकरे, तसेच राकेश शर्मा, श्याम हडपवार आदींसह स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
आता विदर्भाची लढाई बॅलेटच्या माध्यमातून लढण्याचा निर्धार
By admin | Published: August 07, 2016 12:24 AM