महाप्रसादसाठी नोंदणी : मंडळांना प्रोत्साहित करून करणार जागृतीकपिल केकत गोंदियामहाप्रसाद वितरणासाठी सार्वजनिक गणेशोत्सव किंवा दुर्गोत्सव मंडळांना अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) नोंदणी करणे गेल्यावर्षीपासून बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र यासंदर्भात अनेक मंडळांना माहितीच नसल्यामुळे मंडळांकडून नोंदणी केली जात नाही. त्यामुळे मंडळांत जनजागृती करून महाप्रसाद नोंदणीसाठी प्रवृत्त करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनचे अधिकारी आता थेट मंडळांशी संपर्क करून त्यांना साकडे घालणार आहे.गणपती उत्सव व दुर्गा उत्सवाची परंपरा जिल्ह्याची काही वेगळीच आहे. यातही गोंदिया शहरातील दुर्गा उत्सव म्हणजे उत्साहाला एकच उधान आलेले असते. हेच कारण आहे की, लगतच्या छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यातील लोकांची पावलेही या दोन उत्सवांत आपसुकच गोंदियाकडे खेचली जातात. अशा या भाविकांची सोय व्हावी या उद्देशातून मंडळांकडून महाप्रसादाचे वितरण केले जाते. त्यातही दुर्गाउत्सवात तर प्रत्येक मंडळाकडून महाप्रसाद वितरीत केला जातो. महाप्रसाद वितरणातून पुण्य कमविण्याचे सत्कार्य करीत असताना काही ठिकाणी योग्य ती खबरदारी न घेतल्याने महाप्रसादातून विषबाधा होण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळेच महाप्रसाद वितरणासाठी मंडळांना अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नोंदणी करून परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही परवानगी देताना एफडीए विभाग महाप्रसाद वितरण करताना कोणती खबरदारी घेणार याबाबतच्या अटी मान्य करण्यास मंडळांना बाध्य करणार आहे. यामागे कोणत्याही प्रकारे विषबाधेसारखे प्रसंग घडू हाच उद्देश आहे. मात्र परवानगी न घेणाऱ्या मंडळांवर या विभागाकडून गेल्यावर्षी आणि यावर्षीही काहीच कारवाई झाली नसल्याने मंडळांकडून ही परवानगी घेण्याबाबत गांभिर्याने विचार केला जात नाही. यातच अनेक मंडळांना याबाबतची माहितीसुद्धा नाही.विनापरवानगीच मंडळांकडून महाप्रसादाचे पुण्य लाटले जात आहे. यासाठी मात्र शासकीय नियमांची पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे थेट कारवाई करण्यापूर्वी मंडळांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न आता एफडीएकडून केल जाणार आहे. यासाठी विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी सुरूवातीला स्वत: शहरातील मोठ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना नोंदणीबाबत माहिती ेदेऊन त्यासाठी प्रोत्साहीत करणार आहेत.
आता ‘एफडीए’ घालणार दुर्गोत्सव मंडळांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2016 2:03 AM