पारदर्शक पद्धत : जीएसटी प्रणाली लागू लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : देशातील अप्रत्यक्ष कर प्रणालीमध्ये आमुलाग्र बदल करणारा वस्तू व सेवाकर कायदा १ जुलैपासून संपूर्ण देशात लागू झाला आहे. ही कर प्रणाली राष्ट्रीय सकल उत्पन्नात वृध्दी करणारी आहे. देशात अप्रत्यक्ष कराची एकच पारदर्शक पध्दत, हा वस्तू व सेवाकर प्रणालीचा मूळ उद्देश आहे. विक्रीकर भवन आता वस्तू व सेवाकर भवन झाले आहे. उद्योजक व व्यापाऱ्यांसाठी ही कर पध्दत सोपी असून त्यातील तरतुदीमुळे वस्तू व सेवांच्या किमतीत घट होवून ग्राहकांना त्याचा फायदा होईल. या कर पध्दतीबाबत माहिती देण्यासाठी तसेच त्याबाबतच्या शंकाचे निरसन करण्यासाठी वस्तू व सेवा कर विभागातील अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात जवळपास ४२५ ठिकाणी कार्यशाळा घेतलेल्या आहेत. तसेच व्यापाऱ्यांना नोंदणी, विवरणपत्र दाखल करणे इत्यादी बाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी वस्तू व सेवा कर विभागाच्या राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये जीएसटी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. या कर प्रणालीबाबत दडपण घेवू नये. कर प्रणाली लागू करताना काही कायदेशीर तरतुदी, प्रक्रिया यामध्ये अडचणी असतील तर त्या लवकरच सोडविल्या जातील. कापड उद्योगातील व्यापाऱ्यांप्रमाणे जे करदाते नव्यानेच कर भरण्यास पात्र होत आहेत त्यांना ३० जुलै २०१७ पर्यंत अर्ज करण्यासाठी वेळ आहे. शासनाने सर्व करदात्यांच्या खऱ्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. सर्व व्यापारी संघटना व उद्योग संघटनांनी आपल्या सभासदांच्या अडचणी एकत्रित करून वस्तू व सेवाकर विभागाकडे अथवा शासनाकडे सादर करावे. करदात्यांना नव्याने नोंदणीसाठी अर्ज करावयाचा आहे त्यांना वस्तू व सेवाकर विभागातील जीएसटी सुविधा केंद्र तसेच शासनमान्य ई-सेवा केंद्रातून मदत घेवूनसुध्दा आॅनलाईन अर्ज करता येईल. वस्तू व सेवाकर कायद्याखाली सुरूवातीचे दोन महिने या नमून्यात विवरणपत्र तयार करण्यासाठीची युटीलीटी वस्तू व सेवाकर विभागामार्फत उपलब्ध करु न देण्यात येत आहे. विक्रीकर भवन कार्यालयाचे नाव आता वस्तू व सेवाकर भवन, असे करण्यात आले आहे. वस्तू व सेवाकर कायद्याच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम १ जूलै रोजी वस्तू व सेवाकर उपायुक्त एस.एच. मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. नामफलकाचे अनावरण मेश्राम यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कर सल्लागार युनियनचे अध्यक्ष श्याम खोडेचा, केंद्रीय वस्तू व सेवाकर निरिक्षक गौरव वर्मा, सी.ए. युनियनचे सदस्य धीरज अग्रवाल, पत्रकार कपिल केकत उपस्थित होते. संचालन कर निरीक्षक ए.के. नगरधने यांनी केले. आभार कर निरीक्षक बी.एस. पाटील यांनी मानले.
विक्रीकर भवन बनले आता वस्तू व सेवाकर भवन
By admin | Published: July 08, 2017 12:47 AM