लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाची दुसरी लाट ओसरली. आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. अशात ठरवून असलेले विवाह सोहळे आता त्यापूर्वी आटोपून घेण्यासाठी वर-वधू पित्यांची धावपळ सुरू झाली आहे. शासनाने विवाह सोहळ्यांसाठी परवानगी बंधनकारक केली आहे. त्यामुळे लग्नाची कामे सोडून वर-वधू पित्यांना परवानगीसाठी शासकीय कार्यालयात ये-जा करावी लागत आहे. लग्न समारंभासाठी २०० वऱ्हाडींच्या अटींचे पालन करणे गरजेचे आहे. विवाह सोहळा आटोपण्यासाठी सर्वप्रथम उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. त्यांची परवानगी मिळाल्यानंतरच विवाह करता येणार आहे. तसेच दोन्ही पक्षाकडील २०० पेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत. याशिवाय ज्या सभागृहात-लॉनमध्ये विवाह सोहळा घेण्यासाठी मुभा देण्यात आली आहे, तेथे अर्जासोबत वधू-वराचे आधार कार्ड, त्यांचे फोटो, लग्नाची पत्रिका, ज्या सभागृहात विवाह होणार आहे त्याचे परवानगी पत्र द्यावे लागते.
लग्न समारंभासाठी या आहेत अटीमंगल कार्यालय : खुल्या प्रांगणातील लॉन किंवा बंदिस्त कार्यालयातील विवाह सोहळे प्रांगण, लॉन, मंगल कार्यालय, हॉटेलमधील आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल अशी अट घालून दिली आहे.लाॅन: खुल्या प्रांगणात होणाऱ्या विवाह सोहळ्यात प्रांगण किंवा लॉनमध्ये ५० टक्के, परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती लग्न समारंभात उपस्थित राहू शकतील. बंदिस्त कार्यालय, हॉटेलात उपस्थिती संख्या ५० टक्के असणार आहे. विशेष म्हणजे, सभागृहाचे सॅनिटायझेशन व मास्कचा वापर अनिवार्य आहे.
मंगल कार्यालय चालकांत उत्साहमंगल कार्यालयात २०० लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्यास प्रशासनाने परवानगी दिल्याने आता आमचा बंद असलेला रोजगार सुरू होणार अशी आशा आहे. लोकांचे लग्न समारंभ आटोपले असले तरी आता एक- दोन लग्न समारंभ आपल्या मंगल कार्यालयातून होणार आहेत.- पुष्पकांत बहेकार, मंगल कार्यालय चालक
ऐन लग्नाच्या मोसममध्ये कोरोनाचा कहर होता. त्यामुळे मंगल कार्यालय बंदचे आदेश दिले होते. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने जिल्हा प्रशासनाने मंगल कार्यालय सुरू करण्याचे आदेश दिलेत. परंतु, पावसाळ्यात लग्न समारंभ अत्यंत कमी आहेत.- कैलाश शेंडे, मंगल कार्यालय चालक
लग्नाच्या तारखा यंदा लग्नाच्या तारखा नसल्याने तुळशी विवाहापर्यंत लग्न समारंभासाठी वाट पाहावी लागणार आहे.आज समाज कितीही मॉडर्न झाला असला तरीही प्रत्येकच धर्म व जातीत विवाह सोहळ्यात पारंपरिक काही नियमांचे पालन केले जातेच. यात विवाह सोहळ्यांसाठी शुभमुहूर्त बघितलाच जातो. हिंदू धर्मात पंडितांकडून शुभ दिवस व वेळ बघूनच विवाह ठरविले जातात. जोडप्याच्या भावी सुखी संसारासाठी आजही प्रत्येकच घरात विवाहाचा शुभ मुहूर्त बघितला जातोच. देवशयनी एकादशी नंतर देवता शयन करतात असे म्हटले जाते व त्यामुळेच या काळात शुभ कार्य केले जात नाही. तुळशी विवाहनंतरच आता शुभ कार्यांना सुरूवात केली जाईल.केे -पंडित गोविंद शर्मा
रोजी सुरू झाल्याने बॅंडवालेही जोरातलग्न समारंभ सुरू झाल्याने आता आमची रोजीरोटी सुरू झाली. परंतु, पावसाळा असल्याने लग्न समारंभ अत्यंत कमी आहेत. लग्नाच्या तारखा नसल्याने प्रशासनाने मुभा देऊनही आम्ही रिकामेच आहोत.- आशिष तलमले, बॅंड चालकजेव्हा लग्न समारंभ होते, तेव्हा आम्हाला परवानगी नव्हती. आता लग्नाच्या तारखाच नसताना जिल्हा प्रशासनाने लग्नाची मुभा दिली आहे, अशा वेळेस आम्हाला रोजगाराचा शोध असतानाही लग्नच नाहीत तर काम कसे करणार.- अंकेश गणवीर, बॅंड चालक