इच्छुकांकडून सेटिंग सुरू : वरिष्ठांकडे मनधरणी वाढली गोंदिया : नगर परिषद उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यपदी कुणाची वर्णी लागते यासाठी असलेली उत्सुकता आता शमली आहे. शुक्रवारी (दि.१०) झालेल्या उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडी नंतर सर्वांच्या लागल्या आहेत त्या विषय समित्यांकडे. समित्यांचे सभापतीपद आता आपल्याच पदरी पडावे यासाठी इच्छूकांकडून सेटींग सुरू झाली आहे. करिता वरिष्ठांकडेही मनधरणीचे प्रकार वाढले असून काहीही करून सभापतीपद बळकाविण्यासाठी आता नवनवे समिकरण तयार केले जात आहेत. शिव शर्मा यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली व स्वीकृत सदस्यांची निवड झाल्याने आता विषय समित्यांचे गठन व सभापतींची निवड उरली आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा विषय समित्यांकडे लागले असून सभापतीपद बळकाविण्यासाठी आता इच्छूक सदस्यांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. नगर परिषदेत बांधकाम, महिला व बाल कल्याण, पाणी पुरवठा, शिक्षण तसेच स्वच्छता व आरोग्य समित्या असून त्यांचे सभापतीपद असतात. यात महत्वाचे म्हणजे बांधकाम समिती सभापतीपद मानले जाते. ते का आता येथे सांगणे गरजेचे नसून, सर्वांच्या नजरा त्याच समितीकडे लागून असतात व त्यासाठी सर्वांचा आग्रह सुद्धा असतो. शिवाय स्वच्छता व आरोग्य समिती उपाध्यक्षांकडेच असते. त्यामुळे उर्वरीत समित्यांचे गठन करून त्यांच्या सभापतींची निवड केली जाते. आता उपाध्यक्षांची निवड झाली असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर विषय समित्यांची निवड केली जाणार असल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसांतच विषय समित्यांचे गठन करून सभापतींची निवड केली जाणार आहे. त्यामुळे आता इच्छूक सदस्यांकडून सभापतीपद मिळवून घेण्यासाठी आतापासून सेटींग सुरू करण्यात आली आहे. यात यंदा पुन्हा नगर परिषदेत एंट्री झालेल्या व मागील कार्यकाळात सभापतींचे पद न मिळविलेल्या सदस्यांचा जास्त अधिकार असल्याचे दिसून येत आहे. तर यासाठी या सदस्यांकडूनही इच्छा व्यक्त केली जात आहे. आपली ही सेटींग यंदा फिस्कटू नये यासाठी या सदस्यांकडून वरिष्ठांकडे मनधरणीचे काम केले जात आहे. यातूनच काही दिवस निघाल्यापासून ते रात्रीपर्यंत पक्षातील वरिष्ठांकडेच तळ मांडून असल्याचेही ऐकीवात आहे. (शहर प्रतिनिधी)
आता नजरा विषय समित्यांकडे
By admin | Published: February 13, 2017 12:23 AM