गोंदिया : आषाढ मास तसा मंगल कार्यांसाठी शुभ मानला जात नसून यामध्ये मंगल कार्य केले जात नसल्याचे दिसून येते. मात्र सध्या आषाढ मासातही लग्न, गृहप्रवेश आदी मंगल कार्यांचा धडाकाच लागला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आषाढात मंगल कार्ये कशी होत आहे हे बघून कित्येकांना आश्चर्याचा धक्काच बसत आहे. मात्र संपूर्ण आषाढ मास खराब नसून त्यातही मंगल कार्य करता येत असल्याचे पंडितांचे म्हणणे आहे. येथील पंडित गोविंद शर्मा व पंडित पप्पू महाराज यांच्यानुसार, आषाढात शुभ मुहूर्त असून त्यानुसार मंगल कार्य करता येतात. मात्र देवशयनी एकादशीपासून देव शयन करीत असल्याने तोपर्यंतच मंगल कार्य करता येतात. मात्र त्यानंतर ४ महिने मंगल कार्य करीत नसून तुळशी विवाहपासून पुन्हा मंगल कार्यांना सुरुवात होत असल्याचे सांगीतले. पूर्वी आषाढ व श्रावण मासात भयंकर पाऊस असायचा शिवाय तेव्हाचे वातावरणही बदलते असायचे यामुळे या आषाढात मंगल कार्य टाळले जात होते. याचा अर्थ आषाढ मास खराब असल्याचा नसून फक्त देवशयनी एकादशीपर्यंतच मंगल कार्य करता येतात, असा असल्याचे पंडितांचे म्हणणे आहे.
-------------------------------
विवाह सोहळ्यात फक्त ५० जणांनाच परवानगी
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून आता परिस्थिती नियंत्रणात असल्याने विवाह सोहळ्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र असे असतानाही विवाह सोहळ्यांसाठी काही निर्बंध लावण्यात आले असून ५० जणांची मर्यादा आजही कायम आहे. याशिवाय, चेहऱ्यावर मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर व शारीरिक अंतराचे पालन या अटी लागू आहेत.
-----------------------------------
आता लागणार मंगल कार्यांना ब्रेक
आषाढात मंगल कार्य केले जात नसल्याने बोलले जाते. मात्र देवशयनी एकादशीपर्यंत मंगल कार्य करता येत असल्याचे पंडितांचे म्हणणे असल्याने यंदा मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे, गृहप्रवेश आदि मंगल कार्य आटोपण्यात आल्याचे दिसले. पंडितांनी दिलेल्या शुभमुहूर्तानुसार १५ तारखेपर्यंतच विवाहासाठी शुभ मुहूर्त होता. त्यामुळे आतापर्यंत सभागृहांना बुकिंग होती. आता मात्र शुभ मुहूर्त नसून ४ दिवसांवर देवशयनी एकादशी आल्याने बुकिंग नाहीत.
-------------------------------
आषाढात या होत्या शुभ तारखा...
यंदा देवशयनी एकादशी २० तारखेला आली असून त्यापूर्वी १, २, ७, ८, १२, १३, १४ व १५ तारखेला विवाहासाठी शुभ मुहूर्त होता. शिवाय याकाळातच गृह प्रवेशही आटोपण्यात आले आहेत. संपूर्ण आषाढ मास खराब नसून देवशयनी एकादशीनंतर मंगल कार्य केले जात नाहीत.
- पं. गोविंद शर्मा
--------------
पूर्वी आषाढात जोरदार पाऊस पडत होता. श्रावणात पावसाची झड लागत होती, त्यामुळे शुभकार्य पुढे ढकलले जात होते. त्यामुळे आषाढ मासात शुभकार्य करीत नाही, असा समज निर्माण झाला आहे. मात्र देवशयनी एकादशीपर्यंत मंगल कार्य करण्यास काहीच हरकत नाही. देवशयनी एकादशी नंतर पुढे तुळशी विवाहपर्यंत मात्र शुभ कार्य करता येत नाहीत.
- पं.पप्पू महाराज