कपिल केकत
गोंदिया : लसीकरणासाठी राज्य शासनाच्या कुटुंब कल्याण कार्यालयाने जिल्ह्यात १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील १०३०२२७ नागरिकांचे उद्दिष्ट दिले होते. जिल्ह्याने शनिवारपर्यंत (दि.२५) यातील १०२९५६६ नागरिकांचे लसीकरण केले आहे. म्हणजेच, आतापर्यंत जिल्ह्यात ९९.९२ टक्के लसीकरण झाले असून आता फक्त ८३४ नागरिकच लस घेणे शिल्लक असल्याचे चित्र आहे. अशात सोमवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्याने शंभर टक्के लसीकरण केल्याची गूड न्यूज येणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
देशात १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणात गोंदिया जिल्हा सुरूवातीपासूनच अग्रेसर राहिला आहे. दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात केलेल्या कहराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने उत्तम नियोजन करून लसीकरणाला गती दिली. परिणामी झपाट्याने लसीकरण होत गेले व शनिवारपर्यंत (दि.२५) जिल्ह्यातील १०२९५६६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून त्याची ९९.९२ एवढी टक्केवारी आहे. यामध्ये ७३१८२७ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून त्याची ७१.०२ एवढी टक्केवारी आहे. तर २९७७३९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्याची २८.९० एवढी टक्केवारी आहे. जिल्ह्यातील १०२९५६६ नागरिकांचे लसीकरण झाल्याने आता फक्त ८३४ नागरिकांचे लसीकरण व्हायचे असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात दिवसाला १००००-१५००० च्या घरात नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. अशात रविवारची सुटी सोडून सोमवारी मात्र जिल्ह्याने शंभर टक्के लसीकरण केले अशी गूड न्यूज अपेक्षित आहे. यासाठी आतापर्यंत जिल्हावासीयांनी केलेल्या सहकार्याची आता पुढेही कोरोनाला मात देण्यासाठी गरज आहे.
----------------------------
दुसरा डोस घेणाऱ्यांनी केला हिरमोड
जिल्हा आता शंभर टक्के लसीकरणाकडे वाटचाल करीत आहे. यात ७३१८२७ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून त्याची ७१.०२ एवढी टक्केवारी अपेक्षित आहे. मात्र, दुसरा डोस घेणाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाचा हिरमोड केला आहे. कारण, जिल्ह्यातील फक्त २९७७३९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्याची २८.९० एवढी टक्केवारी आहे व ती अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. लाखाच्या घरात नागरिकांनी मुदत निघून गेल्यानंतरही दुसरा डोस घेतलेला नाही. ही बाब नक्कीच एवढ्या सर्व परिश्रमानंतर अपेक्षित नाही.
-------------------------------
आता टार्गेट दुसऱ्या डोसचे
कोरोनाला मात देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसींचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. असे असतानाही लाखांच्यावर नागरिकांनी मुदत संपूनही दुसरा डोस घेतला नसून असे करून ते शासनाचे नव्हे तर स्वत: सह आपल्या कुटुंबाचे नुकसान करीत आहेत अशी म्हणण्याची पाळी आली आहे. आता शंभर टक्के लसीकरण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाचे टार्गेट दुसरा डोस राहणार आहे.