गोंदिया : मध्यंतरी नियंत्रणात असलेल्या कोरोनाने जिल्ह्यात आता पुन्हा आपले पाय पसरण्यास सुरुवात केल्याने बाधितांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे ग्रीन झालेल्या तालुक्यांत पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. परिणामी, आता जिल्ह्यातील सात तालुक्यांत पुन्हा कोरोनाबाधित रुग्ण वाढले असून, फक्त देवरी तालुकाच सद्य:स्थितीत कोरोनामुक्त आहे.
कोरोना नियंत्रणात असल्याने नागरिकांनी उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम आता अवघ्या राज्यातच बघावयास मिळत आहे. आता पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढत चालला असून, नियंत्रणात असलेली जिल्ह्यातील स्थितीही आता हाताबाहेर जाताना दिसत आहे. नगण्य संख्येत येत असलेली बाधितांची दररोजची आकडेवारी आता २० वर जात आहे. शिवाय मृतांची संख्याही वाढत चालली आहे. यामुळेच आता शासनाने पुन्हा एकदा काही निर्बंध घातले आहेत. मात्र, नागरिक निर्बंध धुडकावत आपल्या मनमर्जीने वागत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
जिल्ह्यात गोंदिया तालुका प्रथम, तर तिरोडा तालुका द्वितीय क्रमांकाचा हॉटस्पॉट आहे. मात्र, मध्यंतरी कोरोना नियंत्रणात असताना तिरोडा तालुका कोरोनामुक्त झाला होता. एवढेच नव्हे, तर जिल्ह्यातील पाच तालुके कोरोनामुक्त झाली होती. दुसऱ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट असलेला तिरोडा तालुका कोरोनामुक्त झाल्याने चांगलाच दिलासा मिळाला होता. आता मात्र बाधितांची संख्या वाढत चालली असताना तिरोडा तालुक्यात कोरोना पुन्हा शिरला आहे. मात्र, दिलासादायक बाब अशी की, एवढ्या कठीण समयीही देवरी तालुका कोरोनाला आता दुसऱ्यांदा शिरण्यापासून अडवून बसला आहे.
--------------------------------
गोंदिया तालुक्याची स्थिती गंभीर
जिल्ह्यात कोरोनाची सुरुवातच गोंदिया शहरातून झाली आहे. सुरुवातीपासूनच गोंदिया शहर व तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे व आजही कायम आहे. आता पुन्हा एकदा बाधितांची संख्या वाढत असतानाच सर्वाधिक बाधित गोंदिया तालुक्यातील निघत आहेत. हेच कारण आहे की, आजही तालुक्यात १२३ क्रियाशील रुग्ण असून, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अर्जुनी-मोरगाव तालुक्यांत १३, तर तिरोडा तालुक्यात ९ बाधित आहेत. म्हणजेच, गोंदिया तालुक्याची स्थिती गंभीर असून, नागरिकांनी आता काळजी घ्यायची गरज आहे.