बालक व मातांचे आरोग्य : १०० टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्टगोंदिया : शुन्य ते २ वर्ष वयोगटातील बालके व गरोदर मातांना राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकानुसार सर्व लसीच्या मात्रा मिळालेल्या नाहीत, अशा सर्व असुरक्षित बालकांचे व गरोदर मातांचे संपूर्ण लसीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लसीकरणाच्या ‘मिशन इंद्रधनुष्य’च्या दुसऱ्या टप्याला ७ आॅक्टोबरपासून सुरूवात करण्यासाठी मंगळवारी घेतलेल्या सभेत जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रवी धकाते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद वाघमारे, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव दोडके व युनिसेफ कन्सल्टंट डॉ. विश्वजीत भारद्वाज उपस्थित होते. डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले, बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी माध्यम आहे. जिल्ह्यातील आशा कार्यकर्ती, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविकांच्या विशेष सहकार्यातून मिशन इंद्रधनुष्यचा दुसरा टप्पा यशस्वी करा, एकही बालक व गरोदर माता लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुकाअ गावडे म्हणाले, आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचे काम मिशन म्हणून करावे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात जाऊन नावे नोंदणी करून १०० टक्के लसीकरण करावे असे ते म्हणाले.इंद्रधनुष मोहीम ७ ते १३ आॅक्टोबर, १६ ते २२ नोव्हेंबर, १६ ते २२ डिसेंबर आणि २५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०१६ या दरम्यान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत टीटी-१, टीटी-२, डीपीटी, ओपीव्ही, हिपॅटायटस-१,२,३, गोवर १,२, बुस्टर व व्हिटॅमिन ए१२ यासह बालक तसेच गरोदर मातांना आरोग्य विभागाने ठरवून दिलेल्या लसीचा समावेश राहणार असल्याची माहिती अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी यावेळी दिली. सभेला सर्व तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्र्रकल्प अधिकारी, आरोग्य विभागातील अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
लसीकरणासाठी आता इंद्रधनुष्य
By admin | Published: October 08, 2015 1:30 AM