गोंदिया : कोरोना काळात आपल्या स्वकीयांच्या अंत्यदर्शनापासूनही कित्येक जण वंचित राहिले आहेत. कित्येकांना आपल्या कुटुंबीयांच्या अंत्यसमयी ही हात पडले नाहीत. असे असतानाच कित्येकांनी त्यांच्या मुक्तीसाठी तर आजारी असलेल्यांच्या आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. मात्र कठीण समयी पंडितांकडे जाऊन पूजा करणे शक्य नसल्याने येथूनच ऑनलाइन पूजेचा प्रयोग सुरू झाला.
एप्रिल व मे महिन्यात कोरोनाने कहर केला व कित्येकांना त्यांना कुटुंबीयांपासून हिरावून नेले. मात्र वेळ अशी होती की, कित्येकांना आपल्या कुटुंबीयांचे अंत्यसंस्कारही करता आले नाहीत. त्यांच्या मुक्तीसाठी काहींनी पंडितांकडून ऑनलाइन पूजा करवून घेतली. विशेष म्हणजे, कोरोनाने घेरल्याने आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्यासाठीही पूजा करविण्यात आल्याचे प्रकार जिल्ह्यात घडले आहेत. औषध व उपचार केल्यानंतर सर्वांना शेवटचा आधार त्यांच्या आद्य दैवताचा असतो व त्याचीच धाव घेण्यासाठी ऑनलाइन पूजेची ही प्रथा सुरू झाली आहे.
--------------------------------
महामृत्युंजय व रुद्राभिषेकही ऑनलाइन
कोरोनाने काही वाईट दिवस दाखविले तर काही नवीन शिकवणही दिली आहे. यातूनच आता आपल्या मनाच्या संतुष्टीसाठी नागरिकांना ऑनलािन पूजेचा पर्याय हाती लागला आहे. यातूनच महामृत्युंजय, रुद्राभिषेक व सत्यनारायण आदी पूजा ऑनलाइन होऊ लागल्या आहेत. पंडितांना कोणती पूजा करायची आहे हे सांगितल्यावर ते स्वत: विधीविधानांनुसार संपूर्ण आटोपून देत आहेत.
-----------------------------
मास्क मात्र कम्पलसरी
कोरोनाला मात देण्यासाठी मास्क हे प्रभावी शस्त्र असून प्रत्येकालाच मास्क लावण्याची गरज आहे. यापासूनच पंडितही सुटले नाहीत. विशेष म्हणजे, एप्रिल व मे महिन्यातील कठीण काळात पंडितांनीही पूजा करण्यास नकार दिला होता. मात्र कित्येकांनी संबंधांखातर पूजा आटोपून दिल्या. असे असताना त्यांनी पूजेच्या साहित्यासह मास्क व सॅनिटायझरला प्राधान्य दिल्याचे दिसले.
---------------------------
आरोग्यासाठी करविला महामृत्युंजय
आमच्या कुटुंबातील एका सदस्यांची कोरोनामुळे प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांच्या आरोग्यासाठी महामृत्युंजय व रुद्राभिषेक करविला होता. रुग्णाला घेऊन तेथे जाणे शक्य नसल्याने ऑनलाइन पूजा करवून घेतली होती. पूजा ऑनलाइन असो की प्रत्यक्ष बसून करवून घेतली. फक्त देवाकडे आमची प्रार्थना पोहोचावी एवढाच आमचा हेतू होता.
- पूजा करवून घेणारी व्यक्ती
-----------------------------------
कोरोना कठीण काळात घराबाहेर पडणे कठीण असताना पूजेसाठी बाहेर जाणे मला शक्य नव्हते व अन्य व्यक्तींनाही माझ्याकडे येणे शक्य नव्हते. अशात ऑनलाइन पद्धतीने २ रुद्राभिषेक, २ महामृत्युंजय व २ सत्यनारायण पूजा करविल्या आहेत. यातील पूजा करवून हे सगळेच बाहेरगावचे होते. पूजा ऑनलाइन असली तरीही संपूर्ण विधिवत केली जाते.
- पंडित पप्पू महाराज
गोंदिया