गोंदिया : राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक बघता, कित्येक जिल्ह्यांना लॉकडाऊन करण्याची पाळी आली आहे. विशेष म्हणजे, नागपूरलाही लॉकडाऊन करण्याची पाळी आली आहे. असे असतानाही जिल्ह्यात मात्र सर्वच काही मोकाट असून, नागरिकांमध्ये कोरोनाच्या भडक्याला घेऊन काहीच गांभीर्य अद्यापही दिसून येत नाही. अशात मात्र जिल्ह्यावर लॉकडाऊनची पाळी येऊ नये, यासाठी प्रशासनाने कठोर कारवाया करण्याची गरज असल्याचे सूज्ञ नागरिक बोलू लागले आहेत.
मध्यंतरी नियंत्रणात आलेल्या कोरोनाने आता पुन्हा आपले पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा सर्वाधिक भडका सुरुवातीपासूनच महाराष्ट्रात उठत आला असून, आता पुन्हा परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. हेच कारण आहे की, राज्यातील कित्येक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची पाळी आली आहे. त्यातही विदर्भात कोरोनाचा जास्त उद्रेक असल्याने केंद्रीय समितीने अगोदरच सतर्कतेचा इशारा दिला होता. मात्र नागरिकांकडून त्याला प्रतिसाद देण्यात आला नाही व आता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसत आहे. परिणामी कित्येक जिल्हयात लॉकडाऊन करण्यात सुरुवात झाली आहे.
कोरोनाच्या या उद्रेकापासून गोंदिया जिल्हाही सुटला नसून, जिल्ह्यातील दररोजच्या बाधितांच्या आकडेवारीने उसळी घेतली आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या काही तालुक्यांत आता पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला असून, बाधितांची व यामुळेच क्रियाशील रुग्णांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. असे असातानाही मात्र जिल्हावासीयांना कोरोनाला घेऊन आता काहीच भीती नसल्याचे दिसून येत आहे. कारण, कित्येकजण तोंडावर मास्क न लावता बाहेर फिरताना दिसून येत आहेत. शिवाय शारीरिक अंतराचे नियम धुडकावून जिल्हावासीयांचे जीवन जगणे सुरूच आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास पुढे जाऊन भयावह स्थिती निर्माण होणार, यात शंका नाही. याला वेळीच आवर घालण्यासाठी मात्र आता प्रशासनाने कठोर कारवाया करण्याशिवाय दुसरा उपाय दिसत नाही.
----------------------------
लॉकडाऊन टाळण्यासाठी नियम पाळा
कोरोनाचा वाढता स्फोट पुन्हा एकदा राज्याला लॉकडाऊनच्या आगीत झोकत असल्याचे दिसत आहे. यापूर्वी झालेल्या लॉकडाऊनमुळे कित्येकांचा रोजगार गेला व आजही कित्येक कुटुंबांना उपासमारीची झळ सोसावी लागत आहे. अशात आता दुसऱ्यांचा लॉकडाऊन झाल्यास आपल्या गरीब जिल्ह्याला हे परवडणार नाही. याकरिता जिल्हयात लॉकडाऊनची पाळी येऊ नये, असे वाटत असल्याने नागरिकांनी आता नियम पाळण्याशिवाय तरणोपाय नाही.
-------------------------
पोलिसांनी रस्त्यावर उतरणे गरजेचे
राज्य शासनाने कोरोनाचा उद्रेक बघता काही निर्बंध लावून दिले आहेत. मात्र त्यांना धुडकावून जिल्हावासी आपल्याच मस्तीत मस्तपणे वागत आहेत. लग्न सोहळे व अन्य कार्यक्रम सुरूच आहेत. तोंडावर मास्क न लावता फिरणे सुरू आहे. शारीरिक अंतराचे भान न ठेवता वागणे सुरूच आहे. हाच प्रकार न परवडणारा असून, यावर आळा घालण्यासाठी आता पोलिसांनी रस्त्यावर उतरणे गरजेचे झाले आहे. पोलिसांकडून दंडाची आकारणी व कारवाई सुरू झाल्यावरच उपाययोजनांचे पालन होणार, असे सूज्ञ नागरिक आता बोलू लागले आहेत.