गोंदिया : शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करणाऱ्या सेवा सहकारी संस्थांना शासनाने यावर्षी नवीन निकष लावले होते. त्यामुळे संस्थांनी धान खरेदी न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच जिल्ह्यात अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू झाले नव्हते. नवीन निकष रद्द करून त्वरित धान खरेदी सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्याचीच दखल घेत शासनाने जुन्याच निकषानुसार चालू खरीप हंगामात धान खरेदी करण्याचा आदेश गुरुवारी (दि.१) काढला. धान खरेदी त्वरित सुरू करण्याचे निर्देश जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला दिले आहेत.
यंदा दिवाळी तोंडावर आली तरी धान खरेदीला सुरुवात झाली नाही. परिणामी, शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कमी दराने धान विक्री करण्याची वेळ आली होती, तर हमीभावाने धान खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी अडचणीत आले होते. याचीच दखल घेत आ. विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, मनोहर चंद्रिकापुरे, माजी आ. राजेंद्र जैन यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन ही समस्या मार्गी लावण्याची मागणी केली होती. याचीच दखल घेत ना. भुजबळ यांनी २ नोव्हेबर रोजी मुंबई मंत्रालयात या विषयासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीला गोंदिया-भंडारा जिल्ह्यांतील सर्व पक्षीय नेते उपस्थित होते. या बैठकीत धान खरेदी करणाऱ्या संस्थांना लावलेल्या नवीन जाचक अटी रद्द करून जुन्याच निकषानुसार खरेदी करण्यात यावी, संस्थांचे कमिशन व तूट वाढवून देण्यात यावी, गोदाम भाडे व कमिशनची थकीत रक्कम त्वरित देण्यात यावी, धानाची उचल लवकर करण्यात यावी, या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर अन्न व नागरी पुरवठा विभागाने गुरुवारी यासंबंधीचा आदेश काढीत जुन्याच निकषानुसार धान खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच धान खरेदीला त्वरित सुरुवात करण्याच्या सूचना जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाला दिल्या आहेत. त्यामुळे धान खरेदी करणाऱ्या संस्थांची समस्या मार्गी लागली असून, त्यांनी खा. प्रफुल्ल पटेल, आ. विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, मनोहर चंद्रिकापुरे, माजी आ. राजेंद्र जैन यांचे आभार मानले.
अटी शिथिल केल्याने सर्वच केंद्रे सुरू होणार
खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या १४० आणि आदिवासी विकास महामंडळाच्या ४४, अशा एकूण १८४ धान खरेदी केंद्रांवरून हमीभावाने धान खरेदीला सुरुवात होणार आहे. एमईएल पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना या हमीभाव केंद्रावर धानाची विक्री करता येणार आहे.
शेतकऱ्यांनी अल्पदराने खासगी व्यापाऱ्यांना धान विकण्याची अडचण येऊ नये व दिवाळीपूर्वी त्यांना हमीभाव केंद्रावर धानाची विक्री करता यावी, धान खरेदी करणाऱ्या संस्थांच्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला. या सर्व समस्या आता दूर झाल्या असून, धान खरेदीला सुरुवात होईल.
- प्रफुल्ल पटेल, खासदार
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने धान विकण्याची वेळ येऊ नये, खासगी व्यापाऱ्यांकडून त्यांची लुटमार होऊ नये, तसेच धान खरेदी संस्थांच्या अडचणी त्वरित दूर व्हाव्यात यासाठी अन्न व नागरी पुरवठामंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्याचे फलित झाले असून, आता धान खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे.
- विनोद अग्रवाल, आमदार
शासनाने जुन्याच निकषानुसार संस्थांना धान खरेदी करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे धान खरेदीतील अडचण दूर झाली आहे. लवकरच धान खरेदीला सुरुवात होऊन शेतकऱ्यांची दिवाळीत आनंदात जाईल.
- विजय रहांगडाले, आमदार
दिवाळी तोंडावर असताना धान खरेदीला सुरुवात न झाल्याने शेतकरी संकटात आले होते. दरम्यान, शासनाने खरेदीच्या मार्गातील अडचण दूर केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
- मनोहर चंद्रिकापुरे, आमदार
शासनाने धान खरेदीतील सर्व अडचणी दूर केल्या आहेत. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळानेसुद्धा धान खरेदीची प्रक्रिया त्वरित सुरू करावी.
- सहषराम कोरोटे, आमदार