लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांना ईडीने बुधवारी (दि. २३) अटक केली. विशेष म्हणजे यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अनिल देशमुख यांनासुद्धा काही महिन्यांपूर्वी ईडीने अटक केली होती. त्यामुळे नवाब मलिक यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र आता त्यांनासुद्धा ईडीने अटक केल्याने जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण? यावरून चर्चेला उधाण आले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर नवाब मलिक यांना गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बनविण्यात आले. त्यांचा कारभार सुरळीत सुरू असतानाच ईडीने त्यांच्यावरही कारवाईचा फास आवळला. बुधवारी त्यांना अटक केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांवर सलग दोन वेळा आणि ते सुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच असल्यामुळे यापुढे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कुणी स्वीकारेल की नाही, असा प्रश्न जिल्ह्यातील जनतेला पडलेला आहे.कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असताना कॅबिनेट मंत्री राहिलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख यांनी २००५ ते २००९ आणि २००९ ते २०१४ या कालावधीत गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भूषविले आहे. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. तेव्हापासून राज्याचे गृहमंत्री राहिलेले अनिल देशमुख यांनी पुन्हा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भूषविले. पण माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी त्यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप केल्यानंतर त्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लागला आणि त्यांना अटक झाली. अनिल देशमुखांना अटक झाल्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर गोंदिया जिल्ह्याचे पालकत्व सोपविण्यात आले. गोंदिया जिल्ह्याचे त्यांचे दौरेही नियमित सुरू झाले होते. पण अंडरवर्ल्डशी त्यांचे संबंध आहेत आणि त्या संबंधांतूनच त्यांनी जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात घोटाळे केल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपने केले. त्यानंतर त्यांच्याही मागे केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लागला. त्यानंतर बुधवारी सकाळीच त्यांच्याकडे ईडीचे अधिकारी जाऊन धडकले आणि दुपारी त्यांना अटक करण्यात आली. तर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्रात सूडाचे राजकारण सुरू केल्याचा आरोप केला. नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध नोंदविला. तसेच केंद्र सरकारवर आगपाखड केली.