गोंदिया : स्थानिक नगर परिषदेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शुक्रवारी (दि. २६) दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली आहे. सन २०२१ - २२ च्या अंदाजित अर्थसंकल्पात तरतूद, जमा खर्च यावर सभागृहात चर्चा केली जाते. मात्र, अर्थसंकल्पाचे तयार केलेले पुस्तक गुरुवारी (दि. २५) नगरसेवकांना देण्यात आले. त्यामुळे हे पुस्तक वाचायचे केव्हा आणि चर्चा करायची कशी, असा आक्षेप नगरसेवकांनी घेत यांची तक्रार मुख्याधिकारी करण चव्हाण यांच्याकडे केली आहे.
गोंदिया नगर परिषदेचा अनागोंदी कारभार सदैव चर्चेत असतो. कधी नगरसेवकांना सभेची नोटीस वेळेवर दिली जाते, तर कधी माहितीच दिली जात नाही. त्यामुळे हा प्रकार आता नगरसेवकांसाठीसुध्दा नवीन राहिलेला नाही. अर्थसंकल्पासारख्या महत्वपूर्ण सभेचे पुस्तक नगरसेवकांना सभेच्या आदल्या दिवशी दुपारी दिले जात असेल तर सदस्य त्याचे सविस्तर वाचन आणि अभ्यास केव्हा करणार, असा प्रश्न आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नगर परिषदेची अर्थसंकल्पीय सभा व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून शुक्रवारी आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात नेमक्या कुठल्या गोष्टींची तरतूद करण्यात आली आहे, कुठली विकासकामे करण्यात आली आहेत. आपल्या प्रभागात किंवा शहरात कुठली नवीन कामे केली जाणार आहेत. याची माहिती नगरसेवकांना या जमा खर्च पुस्तकाच्या माध्यमातून होत असते. नगरसेवकसुध्दा त्याचा अभ्यास करुन सभागृहात चर्चा करतात. मात्र, नगर परिषदेने गुरुवारी दुपारी या पुस्तकांचे नगरसेवकांना वाटप केले. त्यामुळे त्याचे वाचन करायचे केव्हा, असा प्रश्न आहे. त्यामुळे नगरसेवकांनी यावर आक्षेप घेत अर्थसंकल्पीय सभा पुढील तारखेला घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील पत्रसुध्दा नगरसेविका ज्योत्सना मेश्राम यांनी मुख्याधिकाऱ्यांना गुरुवारी दिले. त्यामुळे यावर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
.....