गोंदिया : कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आल्याचे दिलासादायक चित्र आहे. बुधवारी (दि.२५) एका काेरोनाबाधिताने मात केल्याने आता कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या तीन वर आली आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी ३६१ चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ३१५ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ४६ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. त्यामुळे कोरोनाचा पॉझिव्हिटी रेट शून्य होता. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोना बाधितांची संख्या सातत्याने कमी होत असल्याने जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. जिल्ह्यातील गोंदिया, गोरेगाव, तिरोडा, सडक अर्जुनी, देवरी हे पाच तालुके कोरोनामुक्त झाले आहे तर सालेकसा, आमगाव, अर्जुनी मोरगाव या तीन तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे हे तालुके सुध्दा लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४४४८४२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २२५९२९ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २१८९१३ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ४११९९ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले. ४०४९४ बाधितांनी कोरोनावर मात केली असून सद्यस्थितीत तीन कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे.
............
७ लाख ३३ हजार नागरिकांचे लसीकरण
कोरोना विरुध्दच्या लढ्यात लसीकरण हे महत्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे लसीकरणाची गती वाढविण्यावर भर दिला जात आहे. जिल्ह्यातील ५६८८०८ नागरिकांना पहिला डोस तर १६४४१५ नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी असून ती वाढविण्याची गरज आहे.