गोंदिया : मागील दोन महिन्यांपासून कोरोनाबाधितांचा आलेख सातत्याने खाली येत आहे. त्यामुळेच कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सातवर आली आहे. कोरोनाची दुसरी लाट आता पूर्णपणे ओसरली असून संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आल्याचे दिलासादायक चित्र आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने घट होत असल्याने जिल्ह्यातून कोरोना आता परतीच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी ९८८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यांपैकी ७२९ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २५८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एक नमुना कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.०१० टक्के आहे. बुधवारी जिल्ह्यात एका बाधिताने काेरोनावर मात केली; तर एका रुग्णाची भर पडली. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत २१२७८९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यांपैकी १८७४६० नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत २२११७७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी २०००९१ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ४११७५ कोरोनाबाधित आढळले असून, यांपैकी ४०४६७ बाधितांनी कोरोनावर मात केली. सद्य:स्थितीत सात कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत; तर २३४ नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
..................
लसीकरणाची साडेपाच लाखांच्या दिशेने वाटचाल
कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी व काेरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर देत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५४३८४६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून, लसीकरणाची टक्केवारी ४० टक्क्यांच्या वर आहे.