जिल्ह्यात शुक्रवारी ४७ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली, तर १२ बाधितांनी कोरोनावर मात केली. शुक्रवारी आढळलेल्या ४७ बाधितांमध्ये सर्वाधिक २३ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा १, गोरेगाव ४, आमगाव ४, सालेकसा ४, देवरी ३, सडक अर्जुनी ५, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे. गोंदिया तालुक्यासह आता सर्वच तालुक्यातील रुग्ण संख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुध्दा काेरोनाचा विळखा वाढत असल्याचे चित्र आहे. कोरोना संसर्गाच्या आनुषंगाने आतापर्यंत ९१,४९७ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ७८०५० नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत ७८,६०५ जणांचे नमुने तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७२,२७१ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत १४,९४२ कोरोनाबाधित आढळले यापैकी १४,३९२ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर सद्य:स्थितीत ३६३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, १,३२६ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
सर्वच तालुक्यात वाढतेय बाधितांची संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:28 AM