तिरोडा : तिरोडा आणि गोरेगाव तालुक्यात सातत्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे, तर येथील उपजिल्हा रुग्णालयातील बेड अपुरे पडत आहे. त्यामुळे गोंदिया शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये या दोन्ही तालुक्यांतील रुग्णांसाठी ऑक्सिजन व बेड राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी माजी आ. दिलीप बन्सोड यांनी जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांच्याकडे केली आहे.
तिरोडा व गोरेगाव तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. तिरोडा येथे ग्रामीण रुग्णालयात ४० बेडची क्षमता आहे. ती अपुरी पडत आहे. रुग्णाची संख्या दररोज वाढत आहे. तीच परिस्थिती गोेरेगाव तालुक्याची आहे. कोरोना रुग्णांना गोंदिया येथे रेफर केल्या जाताे, तर बरेचदा बेड उपलब्ध नाही म्हणून परत पाठविले जाते. दरम्यान, याच प्रकारामुळे बरेचदा रुग्ण दगावतात. ही परिस्थिती लक्षात घेता या दोन्ही तालुक्यांतील कोविड रुग्णांसाठी गोंदिया येथील कोविड केअर सेंटरमध्ये बेड आरक्षित ठेवण्यात यावे. तसेच ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन सुद्धा उपलब्ध करून देण्याची मागणी माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केली आहे.